लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत घराच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने चंद्रकांत शिवाजी चोरगे (वय ४६) या फर्निचर व्यावसायिकाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. शनिवारी सकाळी सात वाजता माधव टाॅकीजजवळ लोणार गल्लीत चोरगे नेहमीप्रमाणे सकाळी घराच्या छतावर व्यायाम करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. याबाबत मिरज शहर पोलिसांत नोंद आहे.
चंद्रकांत चोरगे यांचे फर्निचर दुकान असून, लोणार गल्लीत त्यांचे तीनमजली घर आहे. घराच्या तिसऱ्या मजल्यावर व्यायाम करण्यासाठी गेले असताना पाठीमागील गॅलरीतून तोल गेल्याने ते जमिनीवर पडल्याचा अंदाज आहे. चोरगे हे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचे लक्षात येताच, नातेवाईक व शेजाऱ्यांनी खाली धाव घेतली. मात्र, चोरगे यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष परशुराम चोरगे यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ-बहीण असा परिवार आहे. घरावरून पडून फर्निचर व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.