तासगाव : तालुक्यातील हातनूर परिसरातील होनाई डोंगरावरील दोनशे एकरातील लाखो वृक्ष, हजारो पक्ष्यांची घरटी, खंडोबाचे पुरातन मंदिर सोमवारी दुपारी बाराला आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. होनाई देवीच्या तात्पुरत्या उभारलेल्या मंदिरापासून सुरुवात झालेली आग पसरत जाऊन तिने पूर्ण डोंगर वेढला गेला. वीस ते पंचवीस फुटांपेक्षा उंच आगीच्या ज्वाळांमध्ये मोठेमोठे वृक्ष खाक झाले.
हातनूर परिसरात होनाई डोंगर आहे. तेथे परिसरातील विविध शाळा आणि परराज्यातून येणारे भाविक, ग्रामस्थ, नागरिक व ट्रस्टने झाडे लावली आहेत. सोमवारी या झाडांना अचानक आग लागली. आगीची भीषणता इतकी होती की, तिला थोपवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत होते.
सुमारे ६५ टक्के जंगल जळून खाक झाले असून, यामध्ये वन्य व प्राणीजीवनाचे वैविध्य भक्ष्यस्थानी पडले. होनाई देवीचे मूळस्थान, पायऱ्या, कुस्ती मैदान व दर्शनी भागाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. या बाजूकडे आग येऊ नये, यासाठी सुट्टीवर असलेले पोलीस कर्मचारी एकनाथ भाट, शिक्षक शशिकांत पाटील, होनाई परिसरातील बांधकामावर असलेले अमोल सुतार, काही परप्रांतीय कर्मचारी तसेच जनावरे चारण्यासाठी आलेले गुराखी यांनी प्रयत्न केले. त्यामुळे दर्शनी भाग वाचवता आला.
वेळोवेळी लावलेली चिंच, कडूनिंब यांसारखी झाडे या आगीमध्ये जळून खाक झाली. संपूर्ण डोंगर परिसरावर पक्ष्यांचे थवे घरट्यांसाठी आकांत करीत असल्याचे विदारक चित्र दिसून येत होते.
तासगाव नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र, तोपर्यंत जंगलाचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. ज्या ठिकाणी आग सुरू होती, त्या ठिकाणी गाडी जाणे शक्य नव्हते. यामुळे आग पाहात राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही.