एकाच कुटुंबांतील तिघेजण उपचार घेत असताना त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला. अडीच लाख रुपये बिल भरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने मृतदेह देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी खासगी कोविड हॉस्पिटलची तोडफोड केली. रविवारी दुपारी बारा वाजता घटना घडली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही.
सांगली रस्त्यावर खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये पंढरपूर येथील एकाच कुटुंबातील तिघेजण चार दिवसांपूर्वी दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना या कुटुंबातील एका वृद्ध महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. रविवार सकाळपर्यंत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला नाही. उपचाराचे अडीच लाख रुपये बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्याची नातेवाइकांची तक्रार आहे. संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याने गांधी चौक पोलिसांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी रुग्णालयात येऊन मध्यस्थी केल्यानंतर वृद्धेचा मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला. याबाबत डाॅक्टर किंवा रुग्णांच्या नातेवाइकांनी तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.