विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा येथे ३९ लाख रुपये खर्चून बांधलेली रक्त साठवणूक केंद्राची (ब्लड स्टोअरेज युनिट) इमारत धूळ खात पडली आहे. याचा उपयोग काही अधिकारी, कर्मचारी मुक्कामासाठी करीत आहेत. इमारतीच्या आवारात कालबाह्य औषधे फेकण्यात आली आहेत.
शिराळा तालुका डोंगरी असून काही गावांतील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी चालत जावे लागते, तर काहींना कऱ्हाड, कोल्हापूर, सांगली, मिरज, इस्लामपूर येथे जावे लागते. याचा विचार करून आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, विधानपरिषद सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालय, कोकरूड येथे ग्रामीण रुग्णालय उभारले.
रक्ताची आवश्यकता लागते, त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना इस्लामपूर, कऱ्हाड, सांगली, कोल्हापूरला जावे लागते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाजवळच ३९ लाख रुपये खर्चून रक्त साठवणूक केंद्राची सर्व सोयींनीयुक्त इमारत बांधण्यात आली आहे. मात्र ती धूळ खात पडली आहे.
या इमारतीचा लोखंडी चक्रीदरवाजा काढून बाजूला ठेवला आहे. जनरेटर लहान मुलांचे खेळण्याचे साधन बनले आहे. इमारतीत वातानुकूलित व्यवस्था असल्याने चक्क काही कर्मचारी मुक्कामासाठीही येथे असतात. आवारातच कालबाह्य झालेली इंजेक्शन, बाटल्या, औषधे टाकण्यात आली आहेत.
चौकट
मार्च २०२० रोजी कालबाह्य झालेली इंजेक्शन याठिकाणी मोठ्या प्रमाणात फेकून देण्यात आली आहेत. या औषधांना कालबाह्य होऊन एक वर्ष झाले आहे. काही औषधांची पाकिटे अर्धवट जळालेल्या अवस्थेत तशीच आहेत.
चौकट
या केंद्रासाठी प्रथम संदर्भसेवा केंद्राची मान्यता अद्याप मिळालेली नाही. ही मान्यता मिळाल्यावर स्त्री रोग तज़्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ यांची नेमणूक करण्यात येते. त्यानंतर हे केंद्र सुरू केले जाईल. यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-डॉ. संजय साळुंखे,
जिल्हा शल्यचिकित्सक