लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथील रस्त्याकडेच्या कट्ट्याजवळ सायकलवर बसलेला अकरावर्षीय मुलगा मोटारीच्या धडकेत ठार झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झाला. अशितोष तुकाराम पाटील असे त्याचे नाव आहे.
याबाबत तुकाराम मारुती पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून माजी उपसरपंच प्रदीप पाटील यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंद झाला आहे. प्रदीप पाटील मोटारीतून (क्र. एमएच १० एएक्स १०१) नेर्ले गावच्या बाजूने कापूसखेडकडे येत होते. मोटारीचा वेग जास्त असल्याने गावातील रस्त्याकडेला सायकलवर बसून अशितोष कट्ट्यावर पाय ठेवून उभा होता. त्यावेळी मोटारीची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करत आहेत.