लाेकमत न्यूज नेटवर्क
ढालगाव : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे माेटार व दाेन दुचाकी अशा तिहेरी अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजता घडली. अपघातात विजय धोंडीराम पाटील (वय ४०, रा. कवठेमहांकाळ) व सुभाष भीमराव चव्हाण (वय ३५, रा. तुळबुळवाडी, मुचंडी, ता. जत) हे जखमी झाले आहेत.
याबाबतची माहिती अशी, गणेश सूर्यकांत देवांग (वय २०, रा. शेगाव, ता. जत) व त्याची मावसबहीण हे दोघे माेटारीने (क्र. एमएच १२ एसएफ ७६२०) सांगलीहून एमपीएससीची परीक्षा देऊन शेगाव येथे निघाले होते. दरम्यान नागजजवळील भोसले पेट्रोल पंपाजवळ सुभाष भीमराव चव्हाण यांच्या मोटारसायकलला (क्र. एमएच १२ टीए ६३६२) त्यांच्या माेटारीने समाेरुन जोरदार धडक दिली. या अपघातात सुभाष चव्हाण यांचा पाय मोडला. याचवेळी गणेश देवांग यांचा माेटारीवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या विजय धोंडीराम पाटील यांच्या माेटारीस (क्र. एमएच १० बीडब्ल्यू ७१४०) त्यांची धडक बसली. त्यानंतर माेटार रस्ता दुभाजकावर आदळून रस्त्याच्या उजव्या बाजूला सुमारे तीनशे मीटर अंतरापर्यंत गेली. धडक इतकी जोरात होती की, विजय पाटील यांच्या दुचाकीचा चुराडा झाला. ते दुभाजकावरून रस्त्याच्या विरूद्ध बाजूला फेकले गेले. त्यांच्या पायाला व डोक्याला मार लागला आहे. मिरजेच्या खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.