सांगली : लोकसभेची निवडणूक झाल्यापासून जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी बंदोबस्तात आहेत. सतरा ते अठरा तासांची ड्युटी होत असल्याने त्यांचे मनोधैर्य खचले आहे. विश्रांती मिळत नसल्याने त्यांच्या शारीरिक तक्रारी वाढल्या आहेत. आठवड्याची हक्काची सुट्टीही मिळत नसल्याने रजेचा प्रश्नच नाही. सातत्याने काम, बंदोबस्त, जागरण, अवेळी जेवण, या गोष्टींमुळे त्यांचे आरोग्य बिघडत आहे. यातून ताण-तणाव वाढल्याने पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब रेड्डी यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला, तर एका पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी आहेत. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान पन्नास ते ऐंशी गावे आहेत. दररोज कुठे ना कुठे आंदोलन, मारामारी अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना घडते. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याबरोबर मंत्र्यांचे दौरे सातत्याने सुरू आहेत. जिल्ह्यातील स्थानिक मंत्रीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. गेली अकरा दिवस गणेशोत्सव झाला. तत्पूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. या काळात पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या व रजा बंद केल्या होत्या. महिन्यापूर्वी रजा, सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. तोपर्यंत गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाल्याने पुन्हा रजा, सुट्ट्या बंद करण्यात आल्या.सध्या पोलिसांना बंदोबस्ताशिवाय अन्य कोणतेही काम करता येत नाही. यातून प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्यास वेळ नाही. गणेशोत्सव संपला असला, तरी आता विधनासभेची निवडणूक लागणार आहे. यामुळे पोलिसांवरील सध्याचा ताण कमी होईल, असे वाटत नाही. (प्रतिनिधी)धक्क्यावर धक्केजतचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब रेड्डी यांचे हृदयविकाराने निधन झाले. पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस फौजदार मेंगाळ यांचा अपघाती मृत्यू झाला. तासगाव ठाण्यातील हवालदार काकतकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे एकापाठोपाठ एक पोलीस दलास दु:खाचे धक्के बसत आहेत. मात्र हे धक्के पचवून आजही ते बंदोबस्तात मग्न आहेत.
पोलिसांचा ताण वाढला दोघांचा मृत्यू : एकावर उपचार
By admin | Updated: September 9, 2014 23:43 IST