सांगली : जकात, एलबीटीसारखे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत संपुष्टात आले आहेत. घरपट्टी व पाणीपट्टीवर पालिकेचा दैनंदिन खर्चही भागविणे मुश्किल आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर काही जागा विकसित केल्या जातील. या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या जाणार नाहीत, त्याची मालकी महापालिकेचीच राहील, असे काँग्रेसचे नेते मदन पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. महापालिकेने अतिथीगृहाच्या जागेवर बीओटीतून व्यापारी संकुल उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात पाटील यांना विचारता ते म्हणाले की, महापालिकेच्या उत्पन्नाची साधनेच संपली आहेत. त्यासाठी बीओटीसारख्या पर्यायाचा विचार करण्याची वेळ आली आहे. अतिथीगृहाची इमारत पडण्याच्या स्थितीत आहे. प्रसुतिगृहात एकही आॅपरेशन होत नाही. या इमारती पाडून जागा बीओटीतून विकसित केली जाईल. या पैशातून अद्ययावत रुग्णालय उभारले जाणार आहे. बीओटीतून मिळणारा पैसा त्याच जागेच्या विकासावर खर्च होईल. शहरातील अनेक शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. शाळांचे अस्तित्व कायम ठेवून तिथेही व्यापारी संकुलांचा विचार आहे. गतवेळेसारख्या या जागा बिल्डरांच्या घशात जाणार नाहीत, याची मी हमी देतो. जागांची मालकी महापालिकेची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा विभागाच्या खासगीकरणाबाबत ते म्हणाले की, संपूर्ण पाणीपुरवठा विभागाचे खासगीकरण होणार नाही. वसुली व बिलाचे काम एजन्सीला देण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शहरातील ७० टक्के मीटर बंद आहेत. त्यात पाण्याची गळतीही मोठ्या प्रमाणात आहे. मोठे बंगले, अपार्टमेंटमधील कनेक्शनची नोंदच नाही. ज्या भागात २४ तास पाणी येते, तिथेही ३२० रुपयांची बिले मिळतात आणि ज्या भागात तास, दोन तास पाणी येते, तिथेही याच दराने बिलाची आकारणी होते. त्यामुळे पूर्णवेळ पाणी न मिळणाऱ्या भागात मीटरची सक्ती केली जाणार नाही. पण जिथे २४ तास पाणी मिळते, तिथे मात्र मीटर सक्तीचे करणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी) पतंगरावांचा हस्तक्षेप नाही : मदन पाटील महापालिकेच्या राजकारणात आजअखेर आ. पतंगराव कदम यांनी कधीही हस्तक्षेप केलेला नाही. ते आमचे नेते आहेत. त्यांना नगरसेवकांची बैठक घेण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी बैठक घेतल्याचा निरोप अजून तरी नगरसेवकांना नाही. महापौर, स्थायी सभापती, सदस्य निवडीत कधी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. आताही ते हस्तक्षेप करणार नाहीत, असे स्पष्ट करीत महापालिकेचे राजकारण आपल्याच इशाऱ्यावर होईल, याचे संकेत मदन पाटील यांनी दिले. किशोर जामदारांचा भाव वधारला स्थायी समिती सदस्यांच्या निवडीचे अधिकार गटनेत्यांकडे आहेत. तो अधिकार मला नाही, असे मदन पाटील म्हणताच महापालिकेच्या वर्तुळात किशोर जामदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. त्यात मदनभाऊंनी जामदारांशी बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली. यावेळी स्थायी सदस्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळपासून इच्छुकांनी जामदारांचा पिच्छा सोडलेला नव्हता. जामदार माहीर खेळाडू असल्याने मदनभाऊंच्या झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी कोणाला समजू दिला नाही.
बीओटी करू, पण मालकी महापालिकेचीच!
By admin | Updated: August 18, 2015 00:41 IST