सांगली : येथील गवळी गल्लीतील गुंड मिलिंद ऊर्फ मिंच्या गवळी याच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य संशयित राहुल भोसले यानेच मिंच्याला गोळी घातल्याचे शनिवारी पोलिस तपासात स्पष्ट झाले. यासाठी पिस्तूलचा वापर झाला आहे. मिंच्याचा मृतदेह जाळण्यासाठी सांगलीवाडीतून एका ‘वडाप’मधून लाकडे नेल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. खुनासाठी वापरलेली मोटार शहर पोलिसांनी जप्त केली आहे. अनैतिक संबंधातूनच खून झाल्याची शहरात चर्चा सुरू आहे. पण तपासातून अजूनही हे कारण पुढे येत नसल्याचे पोलिस सांगत आहेत. आर्थिक वाद हेच खुनामागे प्रबळ कारण असल्याचा दावा पोलिस करीत आहेत. ४ आॅक्टोबरला मिंच्याला जेवायला जायचे आहे, असे सांगून कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटाजवळ बोलावून घेतले. मिंच्याने स्वामी समर्थ घाटाजवळ दुचाकी लावली. तेथून ते मोटारीने (क्र. एमएच १० सीए ११६३) सांगलीवाडीत एका ढाब्यावर गेले. मिंच्या मोटार चालविण्यास बसला होता. त्याच्यासह राहुल भोसले, सिद्धार्थ चिपरीकर व कवठेपिरान (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत सदस्य भागवत पाटील या चौघांनी जेवण केले. भागवत पाटील यास कवठेपिरानला सोडून येऊया, असे सांगून मिंच्याला नेले. त्यावेळीही मिंच्यालाच मोटार चालविण्यास बसविले. समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोजवळ गेल्यानंतर लघुशंकेचा बहाणा करून मिंच्याला मोटार थांबविण्यास सांगितले. मोटार थांबताच पाठीमागे बसलेल्या राहुल भोसलेने मिंच्याच्या डोक्यात गोळी झाडली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.संशयितांनी मिंच्याचा मृतदेह चालक बाजूच्या आसनावर ठेवला. तेथून ते थेट कारंदवाडीला गेले. तत्पूर्वीच त्यांनी मृतदेह जाळण्यासाठी चिता रचली होती. यासाठी सांगलीवाडीतून एका ‘वडाप’ गाडीतून लाकडे नेली होती. या गाडीचा क्रमांक तसेच चालकाचे नाव निष्पन्न झाले आहे. पण खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर चालक पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. आणखी तीन ते चारजणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. लाकडे कोणत्या वखारीतून घेतली, याचा शोध सुरू आहे. मिंच्याला मारण्यासाठी वापरण्यात आलेली मोटार शनिवारी दुपारी जप्त केली आहे. संजयनगरचे पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी शनिवारी शहर पोलिस ठाण्यात जाऊन संशयित भागवत पाटील याची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. या चौकशीतून आणखी काही माहिती पुढे आली आहे. (प्रतिनिधी)कारंदवाडीत जमीन उकरलीकारंदवाडीत मिंच्याचा मृतदेह जाळल्यानंतर संशयित दुसऱ्यादिवशी तिथे गेले. रक्षा एका पोत्यात भरली. कुणालाही संशय येऊ नये, यासाठी त्यांनी ती जागा उकरली. त्याची मातीही त्यांनी याच पोत्यात भरल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतदेह जाळलेले ठिकाण संशयितांनी दाखविल्याने तिथे काही पुरावे मिळतात का, याचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच खुनासाठी संशयितांनी पिस्तूल आणले कोठून, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.
राहुल भोसलेने घातली मिंच्याला गोळी!
By admin | Updated: September 11, 2016 00:25 IST