मिरज : मिरज रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे कर्मचारी वसाहतीत गणेश ऊर्फ गजनी (पूर्ण नाव समजू शकले नाही. वय ३५) या तरुणाचा शुक्रवारी रात्री दगडाने डोके ठेचून खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून गणेश याचा खून झाल्याचा संशय असून, याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेच्या बंद असलेल्या इंग्रजी प्राथमिक शाळेच्या इमारतीत अज्ञात तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गणेश ऊर्फ गजनी याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता. रक्ताळलेले दगड मृतदेहाशेजारीच पडले होते. हल्लेखोरांनी मारहाण केल्याने गणेशचा हात मोडल्याचे दिसून आले. गणेश ऊर्फ गजनी हा रेल्वेस्थानक परिसरात भुरट्या चोऱ्या व पाकीटमारी करीत होता. अमली पदार्थांचा व्यसनी असलेल्या गणेशचे उत्तमनगरातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याने तो उत्तमनगरात वास्तव्य करीत होता. सोलापूर जिल्ह्यातून घरातून निघून आलेल्या गणेश यास दुर्धर आजाराचीही लागण झाली होती. भुरट्या चोऱ्यांप्रकरणी रेल्वे व शहर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. तो साथीदारांसोबत नेहमीच रेल्वेच्या बंद शाळेच्या इमारतीत अमली पदार्थाचे सेवन करीत असे. शुक्रवारी रात्री तो रेल्वेच्या शाळेत नेहमीप्रमाणे साथीदारांसोबत बसला असताना साथीदारांसोबत भांडण होऊन त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला. खुनाबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रेल्वेस्थानकासमोर हॉटेलात काम करणारे राहुलसिंग ऊर्फ राहुल मुस्तफा शेख (वय ३२) व पंढरीनाथ लक्षमण शेडगे (वय ३०) या दोन तरुणांसोबत त्याचे भांडण झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी पंढरीनाथ व राहुलसिंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून उत्तमनगरातील महिलेशी असलेल्या अनैतिक सबंधातून व रेल्वेस्थानक परिसरात चोरलेल्या ऐवजाच्या वाटणीच्या कारणातून गणेश याचा खून झाल्याचा संशय आहे. ताब्यात घेतलेल्या पंढरीनाथ व राहुलसिंग यांनी गणेश याच्या खूनाची कबुली दिल्याची माहिती मिळाली. खुनासाठी वापरलेले दगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याबाबत गांधीचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
मिरजेत दगडाने डोके ठेचून तरुणाचा खून
By admin | Updated: August 2, 2015 00:12 IST