लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : द आर्ट ऑफ लिव्हिंग, शाखा भिलवडी, ता. पलूस यांच्यातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अध्यात्मगुरू श्री. श्री. रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले. भिलवडी शाखेच्या वतीने गेली सतरा वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. आदर्श ब्लड बँक सांगली यांनी रक्तदानाचा स्वीकार केला.
दक्षिण भाग सोसायटी तळमजला येथे सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले. भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग व पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप, तलाठी गौसमहमद लांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ४० जणांनी रक्तदान केले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून उपस्थित परिचारिकांचा सत्कार स्मिता वाळवेकर, सौ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. संयोजन शशिकांत भागवत, सुबोध वाळवेकर, श्रीकांत जोशी, अशोक जाधव, राजेंद्र कोरे, सुरेश शेणोले आदींनी केले.