लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ‘भाजप स्थापनेनंतरच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत भाजपचे फक्त दोन खासदार निवडून आले. पण राष्ट्रीय अध्यक्षापासून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी केलेल्या कष्टामुळे देशभरात पक्षाला यश मिळाले, असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
गाडगीळ यांच्या कार्यालयात मंगळवारी भाजप स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी गाडगीळ म्हणाले की, यश-अपयशाची चर्चा न करता सर्व आंदोलने, कार्यक्रम सातत्याने कार्यकर्ते करीत राहिले. तत्कालीन केंद्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवाणींच्या देशभर काढलेल्या रथयात्रेमुळे आणि त्यास मिळालेल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजपने सत्तेपर्यंत मजल मारली. अशा लाखो कार्यकर्त्यांच्या अपार परिश्रमामुळे भाजप केंद्रात आणि अनेक राज्यात सत्तेवर आहे. याचे आजच्या पिढीने स्मरण ठेवले पाहिजे. यावेळी भाजपच्या स्थापन दिनानिमित्त झेंडावंदन जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, मुन्ना कुरणे, गणपत साळुंखे, गौस पठाण, रमेश आरवाडे, प्रियानंद कांबळे, आबा जाधव, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.