लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेत सत्ता भाजपची, अडीच वर्षे महापौर भाजपचा, तरीही सत्ताधाऱ्यांच्या महापौर निवडीवरून सध्या तरी शांतता दिसत आहे. दुसरीकडे केवळ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीमध्ये मात्र महापौर पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे करेक्ट कार्यक्रम करतील आणि महापौर पदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, म्हणून अनेकांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवले आहेत. दुसरीकडे महापालिकेत राष्ट्रवादीचा मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसला मात्र कुणीच विचारेना झाले आहे.
महापालिकेत भाजपचे ४३, काँग्रेसचे २०, तर राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. विद्यमान महापौर सुतार यांची मुदत ८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यानंतर महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे यंदा महापौर पदासाठी भाजपसह सर्वच पक्षांत इच्छुकांची गर्दी दिसत आहे. तशीच गर्दी राष्ट्रवादीकडे दिसत आहे. राष्ट्रवादीकडे केवळ १५ इतके संख्याबळ आहे, तर बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसच्या २० नगरसेवकांचा पाठिंबा राष्ट्रवादीने गृहित धरला आहे. त्यात राज्यात सत्तांतर झाल्यापासून महापालिकेतही सत्ताबदल होईल, अशी स्वप्ने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पडू लागली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी महापालिकेत लक्ष घातले तर भाजपचा करेक्ट कार्यक्रम होईल, अशी आसही राष्ट्रवादीला लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी आधी महापौर पदाची तयारी चालविली होती. पण आता त्यांनाही पक्षातून आव्हाने मिळू लागली आहेत. नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, शेडजी मोहिते या ज्येष्ठ नगरसेवकांनीही महापौर पदाची निवडणूक लढविण्याची इच्छा जयंत पाटील यांच्याकडे व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीने तयारी चालविली असताना, त्यांचा मित्र असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. त्यांना राज्यपातळीवरील नेत्यांचे बळ नसल्याने काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झाली आहे.
चौकट
बावडेकरांच्या राजीनाम्याची धाकधुक
भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता ते महापौर पदाच्या शर्यतीत आले आहेत. त्यामुळे इतर इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. सध्या भाजपकडून निरंजन आवटी, धीरज सुर्यवंशी, युवराज बावडेकर, स्वाती शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. सध्या तरी भाजपच्या गडावर शांतता आहे. इच्छुकांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडे असलेले नगरसेवकांचे बळ पाहता, भाजपने सावध भूमिका घेतली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांना टोललत ठेवले जाणार आहे.