मिरज : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी खा. संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांची मिरजेत बैठक घेऊन, जिल्हा बँक निवडणूक लढविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा बँकेची निवडणूक भाजप लढविणार असून प्रस्ताव आल्यास समविचारी मंडळींसोबत युती करू आणि युती झाली नाही तर स्वबळावर लढणार असल्याचे खा. संजय पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. पालकमंत्री पाटील यांनी मिरजेत एका खासगी फार्म हाऊसवर जिल्ह्यातील भाजप नेत्यांची बैठक घेतली. खा. पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे या बैठकीस उपस्थित होते. खा. पाटील यांच्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवून जिल्ह्यातील आमदार व नेत्यांना निवडणुकीसाठी चाचपणी करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. बैठकीनंतर खा. पाटील यांनी सांगितले की, जिल्हा बँक निवडणूक लढविण्यासाठी समविचारी नेत्यांशी चर्चा सुरू आहे. जमले तर त्यांच्यासोबत लढवू, नाही तर स्वतंत्र निवडणूक लढविण्याची तयारी आहे. निवडणूक लढविण्याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. उमेदवारी अर्ज छाननीनंतर पुन्हा चर्चा करून निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची, की इतरांसोबत, याबाबत चाचपणी सुरू आहे. अजितराव घोरपडे म्हणाले की, जिल्ह्यात युतीचे पाच आमदार आहेत. आम्हा सर्वांचे दोन-दोन प्रतिनिधी बँकेत आहेत. नको ती माणसे पुन्हा जिल्हा बँकेत येऊ नयेत, यासाठी निवडणूक लढविण्याची भूमिका आहे. निवडणुकीबाबत काँग्रेसचे स्वयंघोषित सेनापती मोहनराव कदम यांची बडबड सुरू आहे. त्यांचा नंतर विचार करू, असे आ. विलासराव जगताप यांनी सांगितले. जिल्हा बँकेची निवडणूक लढविणारे गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक उमेदवार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीबाबत आम्ही कमी नसल्याचेही खा. पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
जिल्हा बँकेत भाजपही लढणार स्वबळावर
By admin | Updated: April 14, 2015 00:57 IST