सांगली : लसीकरण वेगाने होण्यासाठी केंद्र सरकारकडूनच आवश्यक तेवढ्या लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा होत आहे तरीही राज्यात गतीने लसीकरण सुरू आहे. त्यामुळे भाजपने केंद्र सरकारकडून अधिक लसी मिळविण्यासाठी प्रयत्न करत, लसीकरणावरून राजकारण थांबवावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत केले.
भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यात केवळ जालना जिल्ह्यातच सर्वाधिक लसींचे वितरण करण्यात आल्याचा आरोप केला होता यावर पाटील यांनी प्रत्युत्तर देत राजकारण न करण्याचे आवाहन केले.
पाटील म्हणाले, लसीकरणाचे वाटप केंद्र सरकारकडून होत असल्याने त्यांच्याकडून होणाऱ्या पुरवठ्यानुसारच वाटप केले जात आहे. त्यात लसींचे वाटप करताना कुठेही जिल्ह्याचे नाव त्यावर टाकले जात नाही. जालना येथे लसी एकत्रित केल्यानंतर त्यांचे संपूर्ण मराठवाड्यात वितरण करण्यात आले आहे. मात्र, शेलार हे विसरले असावेत.
राज्याच्या मागणीपेक्षा कितीतरी कमी लसींचा पुरवठा केंद्राकडून होत आहे. त्यामुळे अनेकांना पहाटे पाच वाजेपासून लसीकरण केंद्रावर जाऊन बसावे लागत आहे. दुसरा डोससाठी ८४ दिवसांची अट घालण्यात आली. मात्र, यानंतरही अनेकांना लस मिळाली नाही. त्यामुळे शेलार आणि भाजपनेही कुठली लस कुठे गेली हे बघत बसण्यापेक्षा राज्यासाठी लसींचा पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
चौकट
प्रत्येक गोष्टीवर बोलणे आवश्यक नाही
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या विधानाबद्दल जयंत पाटील म्हणाले की, नाना पटोले नेमके काय बोलले याची मला माहिती नाही. आणि प्रत्येक गोेष्टीवर बाेलले पाहिजे, असेही नाही.