मिरज : मिरज पंचायत समितीच्या आमसभेत आज (सोमवारी) भाजप-राष्ट्रवादीत खडाजंगी झाली. प्रांताधिकाऱ्यांवर कारवाईचा व केंद्र सरकारच्या निषेधाचा ठराव फेटाळण्यात आला.आ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली व सभापती दिलीप बुरसे, उपसभापती तृप्ती पाटील, जि. प. सदस्य प्रकाश देसाई, तहसीलदार किशोर घाडगे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. सहाय्यक गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी रिपाइंचे प्रकाश इनामदार यांनी केली. याची दखल घेण्यात आली. या नुकसानीचे पंचनाम्यांचे काम सुरु होईल, असे आ. खाडे यांनी सांगितले. सभापती बुरसे व जि. प. सदस्य प्रकाश देसाई यांनी जुलै-आॅगस्टमधील मागणी नसणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाची पाणी बिले माथी मारली जात असल्याची तक्रार केली. धान्य व रॉकेल काळाबाजार करणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी विश्वास खांडेकर, आनंदा गडदे यांनी केली. बोलवाड येथील बेकायदा मुरुम उत्खननप्रकरणी तहसीलदारांनी केलेली दंडाची कारवाई गैरलागू असल्याचे कारण देत ती अपिलात रद्द करणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी महादेव दबडे, सचिन कांबळे यांनी केली. आ. खाडे यांनी ही मागणी फेटाळून लावली.सचिन कांबळे यांनी पंचायत समितीचे सदस्य पैसे घेऊन विविध योजनांचा लाभ देत असल्याचा आरोप केल्याने सभापती बुरसे, सतीश निळकंठ संतप्त झाले. आ. खाडे यांनी अशा एजंटांचा बंदोबस्त करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सभेत भूसंपादन कायदा व वीजदर वाढीच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारचा निषेध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार व खाडे समर्थकांत वादावादी झाली. (वार्ताहर)
आमसभेत भाजप-राष्ट्रवादीत वादंग
By admin | Updated: March 3, 2015 00:27 IST