ओळ : पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी भाजपतर्फ़े सभापती गीतांजली कणसे, विक्रम पाटील यांच्यासह सदस्यांनी पंचायत समितीसमोर निदर्शने केली.
मिरज : राज्य शासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी मिरज पंचायत समितीत भाजपच्या सदस्यांनी निदर्शने केली. यावेळी शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
तालुक्यात महापुराने नदीकाठच्या गावांचे नुकसान झाले असताना, पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत व नुकसानभरपाई मिळत नसल्याच्या निषेधार्थ मासिक सभेच्यावेळी भाजपतर्फे सभापती गीतांजली कणसे, सदस्य विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, किरण बंडगर, राहुल सकळे, दिलीप पाटील, त्रिशला खवाटे यांनी राज्य शासनाविरोधात पंचायत समितीसमोर निर्दशने केली. महाविकास आघाडीविरोधात घोषणा देत सदस्यांनी हातात मागण्यांचा फलक घेऊन सभागृहात प्रवेश केला. महापुराने नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीची आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशा घोषणा दिल्या.
सभेत या विषयाचे पडसाद उमटले. राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना मदत मिळावी, बैलगाडी शर्यतींना परवाना द्यावा, अशा मागण्या विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, किरण बंडगर, राहुल सकळे यांनी केल्या. अशोक मोहिते व राहुल सकळे यांनी काही गावांचे पंचनामे अपूर्ण असल्याकडे लक्ष वेधले. उपसभापती अनिल आमटवणे व गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी नुकसानीचे काही गावांचे अपूर्ण असलेले पंचनामे पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
चौकट
शासनाविरोधात ठराव आणि विरोधही!
पूरग्रस्त नागरिकांना वेळेत नुकसानभरपाई मिळत नसल्याबद्दल महाविकास आघाडी शासनाच्या निषेधाचा ठराव मांडण्याचा प्रयत्न किरण बंडगर यांनी केला. मात्र या ठरावास राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अशोक मोहिते यांनी विरोध दर्शवित वरिष्ठ सभागृहाच्याविरोधात ठराव मांडता येणार नसल्याची भूमिका घेतली.