सांगली : महापौर निवडणुकीत पराभवानंतर आता महापालिकेतील नगरसेवकांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी घरचा रस्ता धरावा, अशी मागणी माजी नगरसेवक वि. द. बर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, स्वत:ला चाणक्य समजणाऱ्यांनी आता या पराभवाची जबाबदारी स्वीकारत घरचा रस्ता धरावा. त्यांनी महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या माध्यमातून चार चांद लावले आहेत. महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळातील कारभार पाहता त्यांनी अनेक बाबतीत कर्तृत्व सिद्ध केले आहे. अन्य पक्षांना नावे ठेवणाऱ्या भाजपने आता आत्मपरीक्षण करावे. महापालिकेच्या राजकारणातील सर्वप्रकारचे दाेष भाजपनेही स्वीकारले आहेत. त्यामुळेच त्यांना आता कोणत्याही प्रकारच्या राजकारणावर बोलण्याचा अधिकार नाही. पक्षाला पुरते बदनाम करण्याचे काम महापालिकेतील नेत्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारून स्वत:हून बाजूला व्हावे.