सांगली : शहरातील बायपास रोडजवळील कृष्णा नदीच्या घाटावर विसर्जन करताना दोन गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नगरसेवक शेखर माने व इतरांनी गणेश विसर्जनासाठी हा घाट बंद करण्याची मागणी केली. अखेर प्रशासनानेही या मागणीची दखल घेत या घाटावर विसर्जनास बंदी घातली आहे. शिवाय शिवशंभो चौकातून कर्नाळ चौकीमार्गे विसर्जनासाठी रस्ता खुला केला आहे. गणेश विसर्जनाच्या पाचव्यादिवशी इस्लामपूर बायपास पुलाजवळील घाटावर अहिल्यानगरमधील दोन तरुण विसर्जनासाठी गेले होते. गणेशाचे विसर्जन करीत असताना या दोघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पुलाखालील घाटावर विसर्जन धोकादायक झाले होते. महापालिकेच्या दफ्तरी विसर्जनासाठी केवळ सरकारी घाटाचीच नोंद आहे. तरीही नदीकाठच्या माई घाट, विष्णू घाटावरही विसर्जन होते. या घाटावर सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन होत असल्याने घरगुती गणपती विसर्जनासाठी नागरिक इतर घाटांवर जातात. त्यामुळेच बायपास पुलाखालील घाटावर घरगुती गणेशाचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होते; पण या घाटावर महापालिका, पोलीस प्रशासनाने विसर्जनाची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. दोन गणेश भक्तांच्या मृत्यूनंतर या घाटावर विसर्जनास बंदी घालण्याची मागणी होत होती. नगरसेवक शेखर माने यांनी आयुक्त अजिज कारचे, पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांची भेट घेऊन तशी मागणी केली. बुधवारी महापालिकेने बायपास पुलाजवळून घाटाकडे जाणारा रस्ता बंद केला. तसेच तिथे फलक लावून विजर्सनास बंदी घातली. चिंतामणीनगर, पंचशीलनगर, अहिल्यानगर भागातील विविध मंडळे व घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी हा घाट सोयीचा होता. त्यात शिवशंभो चौकातून कर्नाळ पोलीस चौकीकडे येणारा मार्ग पोलिसांनी बंद केला होता. या मार्गावर विसर्जन मिरवणुकीला बंदी होती. त्यामुळे या भागातील नागरिक व मंडळांना कॉलेज कॉर्नर, इंदिरा भुवनमार्गे सरकारी घाटावर जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन शेखर माने यांनी पोलिसांना विनंती करून विसर्जनासाठी शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी हा मार्ग खुला करून घेतला. (प्रतिनिधी)
बायपास घाटावर विसर्जनास बंदी
By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST