लोकमत न्यूज नेटवर्क
म्हैसाळ : विजयनगर ( म्हैसाळ) येथे शनिवारी संध्याकाळी तासभर झालेल्या वादळी पावसाने द्राक्ष व केळीच्या बागा भुईसपाट केल्या. अनेक झाडे व विजेचे खांब कोसळले. नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केली.
संध्याकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने तासभर अक्षरश: धिंगाणा घातला. नारायण शिंदे, शिवाजी शिंदे, सदाशिव शिंदे या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेवर झाडे उन्मळून पडल्याने बाग भुईसपाट झाली. तारा व खांब कोलमडले. दत्त मंदिराजवळ राजेंद्र भोसले यांची केळीची बाग वादळाने उद्ध्वस्त झाली. सुमारे दहा मिनिटे वादळ बागेत घोंगावत होते. काढायला आलेले केळीचे घड तुटून पडले. गावभागात अनेकांचे पत्र्याचे शेड, गोठे कोसळले. यामध्ये काही जनावरे जखमी झाली.
पावसाचा जोर जास्त असल्याने बागांत पाण्याची तळी साचून राहिली. जिल्हा परिषध अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. रविवारच्या सुट्टीमुळे पंचनामे होऊ शकले नाहीत, ते सोमवारी होतील, असे तहसीलदारांनी सांगितले. दरम्यान, विजेचे कोसळलेले खांब उभे करण्याचे काम रविवारी दिवसभर सुरू होते.