अविनाश बाड / आटपाडी मार्च एन्डमुळे बँकांची वसुली पथके कर्जदारांच्या दारात जप्ती आणि वसुलीसाठी धावाधाव करत असताना, आटपाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची ध्वनिक्षेपक लावलेली जीप घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नागरिकांच्या दारातून फिरू लागली आहे. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या या वसुली मोहिमेला चांगलेच यश मिळू लागले आहे. एका बाजूला जीपविना गटविकास अधिकारी मधुकर देशमुख दुचाकीवरुन फिरत असताना, त्यांच्या शासकीय जीपने मात्र गेल्या चार दिवसांत तब्बल ३८ लाख ९७ हजार रुपये एवढी विक्रमी वसुली केली आहे. पंचायत समितीच्यावतीने विस्तार अधिकारी पी. ए. शिंदे आणि के. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी खास मोहीम सुरु केली आहे. छोट्या गावातील ५ ते १0 ग्रामसेवकांचे पथक आणि गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांची जीप घेऊन काही गावात वाजंत्र्यांसह नागरिकांच्या घरासमोर उभे राहून कर भरण्यासाठी आवाहन करत आहेत. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत सर्व ग्रामस्थ हमखास घरी सापडतील अशा कालावधित वसुली केली जात आहे. गोमेवाडी गावात वाजंत्र्यांसह पथकाने घरोघरी जाऊन वसुली केली. कर दिला नाही तर पाण्याचे कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला जात आहे. प्रत्येक कुटुंबियांना त्यासाठी तास-दोन तासांची मुदत दिली जाते. कारवाईच्या भीतीने लोक पैसे भरत आहेत. याउलट काही गावात या विशेष पथकाला लोकांच्या विविध समस्यांमुळे संतापालाही सामोरे जावे लागत आहे. काहीजण या कारवाईविरुध्द तक्रारी करण्याचा इशाराही देत आहेत. या कारवाईचे संपूर्ण छायाचित्रण करण्यात येत आहे. जीपवर दोन छोटे ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहेत. आटपाडी पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच अशी वसुली मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत ग्रामसेवक डी. बी. देशमुख, एम. आर. माने, आर. एम. कोळी, सी. डी. कर्णे, एस. एस. ढोले, एस. एन. आदाटे, एस. यू. जाधव, एम. आर. कांबळे, डी. के. मोरे, एस. जी. देशमुख यांचा समावेश आहे.
‘बीडीओं’च्या जीपने केली ४0 लाखांची वसुली
By admin | Updated: March 27, 2015 00:59 IST