स्वरवसंत ट्रस्टच्या पं. भीसमेन जोशी संगीत महोत्सवात विकास जोशी यांना वसंत नाथबुवा गुरव पुरस्कार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बाळासाहेब कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, डॉ. डी. जे. आरवाडे, कोटणीस महाराज, दीपक केळकर आदी उपस्थित होते.
फोटो संगीत महोत्सव २
मृण्मयी फाटक-सिकनीस यांनी बहारदार शास्त्रीय गायनाने श्रोत्यांची मने जिंकली
छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वरवसंत ट्रस्टच्या पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवात रविवारी रसिकांनी गायन, वादन आणि नृत्याची मंत्रमुग्ध करणारी अनुभूती घेतली. भावे नाट्यगृहात मैफल रंगली.
आमदार सुधीर गाडगीळ, डॉ. डी. जे. आरवाडे, कोटणीस महाराज, मिलिंद गाडगीळ, डॉ. अभिजित जोशी, दीपक केळकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन व भीमसेनजींच्या प्रतिमेचे पूजन झाले. ‘पं. वसंत नाथबुवा गुरव पुरस्कार’ कलासाधक विकास जोशी यांना गाडगीळ यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
पहिल्या सत्रात मृण्मयी फाटक-सिकनीस यांनी शास्त्रीय गायन केले. राग भीमपलासमध्ये ‘रे बिरहा’ व ‘जा जा रे अपने मंदिरवा’ या बंदिशी गायल्या. त्यानंतर तराना पेश केला. कलाश्री रागात धन धन भाग सुहाग तेरो बंदीश गायली. ‘वद जाऊ कुणाला शरण’ या नाट्यगीताने समारोप केला. संवादिनी साथ पं. अण्णाबुवा बुगड व तबलासाथ प्रा. महेश देसाई यांनी केली. सुकृत ताम्हनकर यांनी ‘मुलतानी’ राग गायला. उठावदार आणि प्रभावी खर्जातील आवाजाने श्रोत्यांची मने जिंकली. ‘गुंतता हृदय हे’ नाट्यगीताला श्रोत्यांनी दाद दिली. ‘पद्मनाभा नारायणा’ या अभंगाने सांगता केली.
संध्याकाळी नंदिनी गायकवाड व अंजली गायकवाड (अहमदनगर) यांचे गायन झाले. तबलासाथ मयंक बेडेकर, संवादिनीसाथ सारंग कुलकर्णी व पखवाजसाथ सनतकुमार बडे यांनी केली. पं. विजय घाटे यांनी मेलोडिक रिदम तबलावादन केले. शीतल कोलवालकर यांच्या कथ्थक नृत्याने महोत्सवाची उंची वाढविली. शाकीर खान यांचे सतारवादन, सुरंजन खंडाळकर यांचे गायन व मिलिंद कुलकर्णी यांचे हार्मोनियम वादनही झाले. विघ्नेश जोशी यांनी निवेदन केले. संयोजन बाळासाहेब कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, विशाल जोशी, केदार कुलकर्णी, केदार आठवले, हरिभाऊ गोडबोले, बाळकृष्ण पोतदार, नागेश कुलकर्णी, विजय कुलकर्णी आदींनी केले.
-----------