सांगली : जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असतानाही, पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. त्यातूनच विशाल पाटील यांना पाडण्यासाठी कुणीतरी सुपारी घेतली होती, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांबरोबर झालेल्या छोट्याशा बैठकीत गटबाजीवर चर्चा करण्यात आली.
पटोले यांनी रविवारी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, उपमहापौर उमेश पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, इंग्रजांची अन्यायी, जुलमी सत्ता घालविण्यासाठी काँग्रेसची निर्मिती झाली; परंतु देशात पुन्हा एकदा इंग्रजांप्रमाणे राजवट सुरू झाली आहे. देशभरात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यासाठी मोठा लढा दिला. वसंतदादांनीही क्रांती लढ्यात गोळ्या झेलल्या, त्यामुळे सांगलीच्या काँग्रेसलाही मोठा इतिहास आहे. दुसरीकडे भाजप देशातील संविधानाविरोधात काम करीत आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीमुळे सामान्य लोकांची जगण्याची कसरत सुरू आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अंबानी-अदानींसारख्या मोठ्या उद्योजकांची पोटे भरणारी व्यवस्था भाजपने निर्माण केली आहे.
काँग्रेसने कष्टाने देश उभारला असताना भाजप तो भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्वी क्रांतिकारकांनी गोळ्या झेलून, संघर्ष करून इंग्रजांची सत्ता उलथवली. आता केवळ काँग्रेसने एकसंध झाल्यास भाजपची इंग्रजांसारखीच सत्ता जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी तौफिक मुलाणी, नामदेवराव मोहिते, प्रा. शिकंदर जमादार, मनीषा रोटे, वहिदा नायकवडी, नगरसेवक मनोज सरगर, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.
गटबाजीवर चर्चा
सांगली जिल्ह्यात काहीजण काँग्रेसच्या पराभवासाठी व भाजपचे लोक निवडून यावेत म्हणून काम करीत आहेत. विशाल पाटील यांचा पराभव अशाच लोकांकडून झाला आहे. येथे पराभव झाला नसता, पण अशा उपद्रवी लोकांमुळे तो झाला, असे पटोले म्हणाले. दुसरीकडे जिल्ह्यात काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याची तक्रार ऐकायला मिळाली; परंतु त्याला गटबाजी म्हणता येणार नाही, तर ती खऱ्याअर्थाने लोकशाही आहे, असेही ते म्हणाले.