दिलीप मोहिते विटा : नवमतदार नोंदणी विशेष मोहीम प्रभावीपणे राबवून विक्रमी संख्येने नवमतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या विटा येथील बळवंत कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते व सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला.
विटा येथे तहसीलदार उदयसिंह गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बळवंत महाविद्यालयात विशेष नवमतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी विक्रमी संख्येने नवमतदारांची नोंदणी प्रक्रिया पार पडली. तसेच मतदार जागृतीसाठी महाविद्यालयासह विटा शहरात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले होते. या सर्व कामांची दखल घेऊन बळवंत कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, नोडल अधिकारी डॉ. प्रवीण बाबर, प्रा. राहुल पाटील, कॅम्पस ॲम्बॅसडर विद्यार्थी सूरज जगदाळे यांनी तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, सहसचिव डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी बळवंत महाविद्यालयाचे अभिनंदन केले.