मिरज : मिरज पंचायत समितीच्या महिला पदाधिकाऱ्याने आज (मंगळवारी) कडबाकुट्टी यंत्रासाठी एरंडोलीच्या दोन लाभार्थ्यांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे संतप्त झालेल्या एरंडोलीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मिरज पंचायत समितीकडे सदस्यांच्या निधीतून कडबाकुट्टी यंत्रांचे पन्नास टक्के अनुदानावर वाटप सुरू आहे. यासाठी सदस्यांची शिफारस घेण्यात येत आहे. मात्र लाभार्थ्यांकडून जादा पैसे घेऊन यंत्रांचे वाटप सुरू असल्याच्या प्रकाराने पंचायत समितीत वाद निर्माण झाला आहे. आज एरंडोली येथील सुकुमार मजगे व अन्य एक लाभार्थी पन्नास टक्के रक्कम भरून कडबाकुट्टी मशीन घेण्यासाठी पंचायत समितीत आले होते. यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे हेही पंचायत समितीत आले होते. एरंडोलीच्या या लाभार्थ्यांनी मिरज पश्चिम भागातील एका महिला पदाधिकाऱ्याकडे कडबाकुट्टी यंत्राबाबत चौकशी केली असता, शिफारशीसाठी प्रत्येकी दीड हजार रुपयांची मागणी केली. या लाभार्थ्यांकडून पैसे घेण्यातही आले. काही वेळातच जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे यांना, गावातील लाभार्थ्यांकडून पैसे घेण्यात आल्याचे समजताच ते संतप्त झाले. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली. यावेळी कृषी विकास अधिकारी भोसले उपस्थित होते. लाभार्थ्यांच्या लुबाडणुकीच्या तक्रारीच्या चौकशीचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. याच महिला पदाधिकाऱ्यांकडून आठवड्यापूर्वी लाभार्थ्यांच्या लुबाडणुकीचा प्रयत्न सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी रोखला होता. (वार्ताहर)
लाभार्थ्यांकडे पैसे मागितले!
By admin | Updated: August 12, 2014 23:17 IST