संख : बेळोंडगी (ता. जत) येथील कृषी सहाय्यक व तलाठी चार महिन्यांपासून गावात आलेले नाहीत. त्यामुळे शासकीय लाभापासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
ग्रामपंचायतीच्या सभेत त्या दोघांच्याही बदलीचा ठराव केला आहे. जत पूर्व भागातील बेळोंडगी तालुक्यापासून ६० किलोमीटरवर आहे. द्राक्ष, डाळिंब फळबागांचे प्रमाण अधिक आहे. सुरेश कोटी कृषी सहाय्यक असून ते चार महिन्यांपासून गावाकडे फिरकलेले नाहीत. ठिबक सिंचन अनुदान, शेततलाव, ताडपत्री अनुदान, फळबाग योजनेचा विमा व इतर कोणताही लाभ दोन वर्षात मिळालेला नाही. अतिवृष्टी नुकसान पंचनामा ग्रामसेवकांनी केला होता, पण कृषी सहाय्यकांनी पंचनामा ग्रामसेवकांना विश्वासात न घेता बदलला आहे. योजनांची माहिती, लाभार्थींची यादी व पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत याची योग्य माहिती मिळत नाही.
हणमंत बामणे तलाठी असून, ते गावात येत नाहीत. करजगीला येऊन काम करून जा, असे सांगतात. सोसायटीचे ई-करार, वारसा नोंंदी, दस्त खरेदी नोंदी आर्थिक तडजोडीशिवाय करीत नाहीत.
शेतकऱ्यांना सातबारा उतारा, बोजा चढविणे, कमी करणे, अन्य कागदपत्रे, कामासाठी करजगी, जतला जावे लागत आहे. त्यांनी जतमध्येच कार्यालये थाटली आहेत. संस्थात्मक क्वारंटाइनची महत्त्वाची जबाबदारी असतानाही ते गावात येत नाहीत.
ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत दोघांच्या बदलीचा ठराव करण्यात आला. या ठरावाला सूचक सुरेश हत्तळी, तर अनुमोदक जितेंद्र सावंत सुतार आहेत.
कोट
कृषी सहाय्यक गावात येत नसल्याने शासकीय योजनेचा लाभ गावाला दोन वर्षांत मिळालेला नाही. तलाठी आर्थिक तडजोडीशिवाय काम करीत नाहीत. सोसायटी ई-करारसाठी पाचशे रुपये, वारसा नोंंदीसाठी एक हजार रुपये घेतात. दोघांची बदली व्हावी, अशी आमची मागणी आहे.
- सोमनिंग बोरामणी, अध्यक्ष, सर्व सेवा सोसायटी, बेळोंडगी.