लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेली दीड वर्षे पर्यटन बंदीमुळे मोकळा श्वास घेणारा दंडोबा डोंगर आता प्लास्टिकच्या कचऱ्यात हरवू लागला आहे. पर्यटन आणि प्रवासबंदी शिथिल झाल्याने पर्यटकांची गर्दी होत आहे, त्यामुळे प्लास्टिकचा कचराही वाढत आहे.
सध्या मंदिरे बंद असली, तरी दंडोबावर दंडनाथाच्या बाहेरून दर्शनासाठी गर्दी होत आहे. श्रावण सोमवारी हजारो भाविक व पर्यटक येत आहेत. सोबत प्लास्टिकचा कचराही आणत आहेत. चांगला पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण यामुळे दंडोबा डोंगर फुलला आहे. त्याला पर्यटकांच्या बेफिकिरीची दृष्ट लागत आहे. ठिकठिकाणी प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, खाद्यपदार्थांचे पाऊच, मोडतोड झालेली छोटी खेळणी फेकून दिल्याचे दिसत आहे. वनभोजनासाठी आलेले हौशी पर्यटक जेवणानंतर प्लास्टिकच्या डीश उघड्यावरच फेकून देत आहेत. सहकुटुंब, सहपरिवार आलेली ही मंडळी माळावर पंगती मांडतात, पण जाताना स्वच्छतेची खबरदारी घेत नाहीत.
चौकट
झाडांचीही हानी
अतिउत्साही पर्यटक छोट्या झाडांशी झोंबाझोंबी करत असल्याने वनीकरणाची हानीदेखील होत आहे. गेल्या दोन वर्षांत दोनवेळा दंडोबावर आगी लागून झाडे भस्मसात झाली होती. वन विभाग व शासनाने पर्यटनदृष्ट्या बऱ्याच सोयी-सुविधा दिल्या आहेत, पण त्यांचा काळजीपूर्वक वापर होताना दिसत नाही. काही स्वयंसेवी संस्था डोंगरावर प्लास्टिक संकलनाचे उपक्रम राबवत असल्या, तरी पर्यटकांच्या बेफिकिरीमुळे नियंत्रण राहत नाही. डोंगरावरच वन विभागाचे कार्यालय आहे, त्यांच्याकडूनही उपद्रवी पर्यटकांना प्रतिबंध केला जात नाही.
कोट
सांगली-मिरजेच्या जवळचे एकमेव निसर्ग पर्यटनस्थळ प्लास्टिकच्या ढिगाऱ्यात हरविण्याची भीती आहे. नागरिकांनी तेथे जाताना स्वत:हून प्लास्टिकबंदी लावून घेतली पाहिजे. वन विभागानेही नाकाबंदी करायला हवी.
- अमोल जाधव, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी, सांगली
सध्या श्रावणामुळे दंडोबावर गर्दी वाढली आहे. त्यामुळेच प्लास्टिकचा कचरा वाढत आहे. स्वच्छतेबाबत कार्यवाही करत आहोत. दंडोबाच्या पायथ्याशी प्लास्टिकबंदीसाठी तपासणी नाका लावता येतो का, याचाही विचार करू.
- युवराज पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी