सांगली : कोरोना व लॉकडाऊनमुळे बाप्पांचे परदेशगमन यंदाही होणार नाही. सांगलीतून दरवर्षी दीड हजार मूर्ती अमेरिकेसह युरोपीय देशांत जातात, त्यांची निर्यात लॉकडाऊनमुळे झालेली नाही.
गेल्यावर्षी मार्चपासूनच लॉकडाऊन सुरू झाल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला होता. यावर्षीही दुसरी लाट कायम असल्याने गणेशोत्सवाच्या जल्लोषावर निर्बंध जाहीर झाले आहेत. हजारो सांगलीकर व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने जगभर विखुरले आहेत. देश सोडला तरी त्यांनी मराठी संस्कृती जपली आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडूनच मूर्तीची परंपरा वर्षानुवर्षे सांभाळली आहे. सांगलीतून दरवर्षी सुमारे दीड हजार मूर्ती परदेशी जातात. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, श्रीलंका, आफ्रिका या देशांत पाठविल्या जातात. प्रवासाला लागणारा प्रदीर्घ वेळ पाहता ऑगस्ट-सप्टेंबरच्या उत्सवासाठी मे, जून महिन्यांतच बाप्पांचे प्रयाण होते.
यंदा लॉकडाऊनमुळे बहुतांश देशांनी परदेशी वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे जलवाहतूक बंद आहे. परिणामी बाप्पांना परदेशी जाता आलेले नाही. मूर्तिकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परदेशस्थ मराठी जनांनाही गावाकडच्या बाप्पांच्या मूर्तीची आराधना करता येणार नाही. धातूची मूर्ती किंवा प्रतिमेसमोरच गणरायाची वंदना करावी लागेल.
उत्सवावरील निर्बंध पाहता स्थानिक भक्तांसाठीही मर्यादित संख्येने मूर्ती तयार करण्यात येत आहेत. मंडळांच्या मूर्तीदेखील कमी उंचीच्या व कोणतीही सजावट नसलेल्या आहेत.
चौकट
प्रदूषण टाळण्यासाठी शाडूच्या मूर्ती
परदेशात प्रदुषणाचे निर्बंध अत्यंत कडक असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळल्या जातात. पूर्णत: शाडूच्या व प्रदूषणविरहीत रंगाने रंगवलेल्या मूर्ती पाठविल्या जातात. विमानाने निर्यात केली जात नाही. ही वाहतूक खर्चीक आहे, शिवाय मूर्तींची हाताळणीही बेजबाबदारपणे होते. परदेशात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या मोडतोडीची भीती असते, त्यामुळे जलवाहतुकीमार्गे पाठविल्या जातात.
कोट
लॉकडाऊनमुळे यंदा गणेशमूर्ती परदेशात पाठविता आलेल्या नाहीत. दरवर्षी मे-जून महिन्यातच जहाजातून निर्यात केली जाते. पण यावर्षी बाप्पा परदेशी जाऊ शकले नाहीत. यामुळे परदेशस्थ मराठीजनांचा विरस झाला आहे.
- हरिहर म्हैसकर, मूर्तिकार, सांगली.