सांगली : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलांना चांगला नाष्टा आणि जेवण मिळाले पाहिजे. यामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. पैसे खाण्याचे उद्योग बंद करून अधिकाऱ्यांनीही दर्जेदार जेवण न देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देऊन, ठेकेदार स्वत: काम करीत नसेल आणि सबठेके देत असेल, तर त्यांचा ठेका त्वरित रद्द करण्यात येईल, असा इशारा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज (सोमवारी) सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला. राज्य आणि विभागस्तरावरून ठेका न देता जिल्हास्तरावरून जेवण पुरवठ्याची निविदा काढून गरजू बचत गटाकडे ते काम सोपविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, पुणे विभागातील ३७ वसतिगृहांना भोजन पुरविण्याचा ठेका मुंबई येथील एका कंपनीला दिला आहे. त्यांना प्रतिविद्यार्थी ४३०० रुपये दिले जातात. या रकमेतून पोषण आहार, जेवण, नाष्टा देण्याचे ठरले आहे. त्या कंपनीने पुन्हा उपठेका (सब कॉन्ट्रॅक्ट) दिले आहे. ते प्रतिविद्यार्थी ३२०० रुपये आहे. म्हणजे काहीही न करता मुख्य ठेकेदार महिन्याला लाखो रुपये उकळत आहे. सबठेकेदार विद्यार्थ्यांना चांगले जेवणही देत नाहीत. या ठेकेदारांच्या विरोधात पुणे विभागातून विद्यार्थ्यांसह पालकांच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी आहेत. ‘लोकमत’मधून आलेल्या बातम्यांची कात्रणेही माझ्यापर्यंत पोहोचली आहेत. मागासवर्गीयांची वसतिगृहे म्हणजे कोणाला पोसण्यासाठी, मोठे करण्यासाठी नसून, गरीब मुलांना चांगले जेवण देण्यासाठी आहेत, याचे भान ठेवून अधिकाऱ्यांनीही ठेकेदारावर कठोर कारवाई करावी. यापुढे वसतिगृहातील ठेकेदारी कदापीही चालू देणार नाही. ठेकेदार सबठेकेदारीतून केवळ पैसेच उकळण्याचे उद्योग करीत असेल, तर त्यांचा ठेका तात्काळ रद्द करण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. याचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश अधिकाऱ्यांनाही दिले आहेत. पुणे विभागातील सर्व वसतिगृहांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा ठेका आणि सबठेके कोठे-कोठे आहेत, याचा वस्तुनिष्ठ अहवाल अधिकाऱ्यांकडून घेण्यात येईल. आठवड्याभरात संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याच्यादृष्टीने शासन निर्णय घेईल.अचानक तपासणीचा इशाराकांबळे यांनी सोमवारी दुपारी बारा वाजता सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहास अचानक भेट दिली. यावेळी वसतिगृहामध्ये स्वच्छता होती, जेवणही उत्तम पध्दतीचे होते. पण, हे केवळ आजच्या दिवसापुरतेच असणार, हे स्वत: मंत्री कांबळे यांनीच अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्ह्यातील वसतिगृहांमध्ये चांगले जेवण मिळत नाही, विद्यार्थी-विद्यार्थिनींना चांगली वागणूक दिली जात नाही, याबद्दलच्या तक्रारी असल्याचे ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त दिलीप घाटे यांनी सांगितले. यातून अधिकारी, ठेकेदारांनी ‘आपण सुटलो’ म्हणण्याचे कारण नाही. आपण स्वत: अचानक जिल्ह्यातील वसतिगृहांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचा इशाराही कांबळे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
भोजनातील सबठेकेदारी रद्द करणार
By admin | Updated: February 9, 2015 23:57 IST