लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृष्णा नदीच्या दोन्ही बाजूस बांबू लागवड केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येईल. भविष्यात इको फ्रेंडली जग निर्मितीसाठी सर्वजण प्रयत्नशील असून, यामध्ये बांबू पिकाची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे मत राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले.
सांगलीत ‘माझी माय कृष्णा’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या जनचळवळीत औदुंबर ते खिद्रापूर या ५६ किलोमीटर नदीकाठावरील दोन्ही बाजूंना बांबूची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध ५० हून अधिक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर मिरजेतील ऑक्सिजन पार्क येथे माजी आमदार पाशा पटेल आणि बांबू लागवड तज्ज्ञ संजीव करपे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पाशा पटेल म्हणाले, केंद्र सरकारने बांबू पिकाचे महत्त्व ओळखून त्याच्या लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात ऊस बहुतांशी ठिकाणी घेतला जातो. परंतु उसाशी तुलना केल्यास शेतकऱ्यांना बांबू पिकाची लागवड आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरणारी आहे. बांबूपासून आसाम येथे इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. साहजिकच तेथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या बांबूला पाच हजार रुपये टन असा दर तेथे मिळत आहे. नदीकाठावर दोन्ही बाजूस बांबूची लागवड करण्याचा उपक्रम हा महत्त्वाचा आहे.
याप्रसंगी संजीव करपे यांनी बांबू पीक लागवडीसंदर्भात मार्गदर्शन केले. स्वागत किशोर पटवर्धन, तर प्रास्ताविक डॉ. मनोज पाटील यांनी केले, आभार डॉ. रवींद्र व्होरा यांनी मानले. कार्यक्रमास पर्यावरणप्रेमींची उपस्थिती होती.
चौकट
नदी वाचवा अभियानास प्रतिसाद
डॉ. मनोज पाटील म्हणाले, बांबूमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होते. औदुंबर ते खिद्रापूर या नदीकाठाच्या दोन्ही बाजूंना कलकी आणि टिश्यू कल्चरची बांबू रोपे लावण्यात येणार आहेत. यामुळे सांगलीच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे. नदी वाचविण्याची मोहीम आम्ही हाती घेतली असून याला नागरिकांचेही मोठे सहकार्य मिळत आहे.