शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ऐवज- वाचावे असे काही

By admin | Updated: February 17, 2017 01:10 IST

जगातील भाषांतील गाजलेली आत्मकथनेच खरा साहित्यिक ऐवज.

माणूस जगण्यासाठी खातो आणि सुसंस्कृत, प्रगल्भ होण्यासाठी वाचतो. सकस अन्न शरीराला पुष्ट करते म्हणून चौरस आहारास पौष्टिक मानले जाते. तसे आपले वाचनही चतुरस्र हवे. ते आपणास चतुर, व्यासंगी बनविते. वाचनात निवड हवी. सारासार विवेक हवा. भारंभार प्रकाशित होण्याच्या आजच्या काळात मी असे पाहतो आहे की, माणसे वाचनाऐवजी पाहण्यात वेळ वाया घालवितात. चॅटस्, मॅसेजिस, क्लिप्स, कोटेशन्स, पिक्चर्स, मेल्स्, आदी मोबाईल्स, संगणकावरील हवीहवीशी वाटणारी सामुग्री, क्षणिक महत्त्वाची खरी, पण क्षणाक्षणाने दिवस निघून जातात आणि मन आणि मेंदू रिकामाच राहतो. क्षणिक रंजनाने माणूस नाही घडत. सातत्यपूर्ण वाचन, विचार आणि आचारांतून माणूस आकारतो. महाराष्ट्र संस्कृतीचे एक वैशिष्ट्य तुम्हास कुठल्याच राज्यात, राष्ट्रात पाहता येणार नाही, ते म्हणजे आपले ‘दिवाळी अंक!’ मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या प्रांगणात दिवाळी अंकाची परंपरा सन १९०९ मध्ये सुरू झाली. त्यालाही पाहता पाहता शंभर वर्षे पूर्ण होऊन गेली. ‘मनोरंजन’ नावाचे एक मासिक त्यावेळी निघत असे. त्याचे संपादक होते काशिनाथ रघुनाथ मित्र. तो पहिला-वहिला अंक माझ्या संग्रही आहेच. शिवाय ‘मौज’ मासिकाचा सन १९२४चा दिवाळी अंकही. वृत्तपत्रे, नियतकालिकांचे पहिले अंक म्हणजे आपला सांस्कृतिक ठेवा, ऐवजच ना! संगीतात ठेवणीतल्या रागदारीस ‘चिजा’ म्हटले जाते, असे किती ऐवज, चिजा मजकडे आहेत म्हणून सांगू? ‘दैनिक केसरी’ पहिला अंक (मंगळवार, दि. ११ जानेवारी १८८१), ‘दैनिक मराठा’ पहिला अंक (गुरुवार, दि. १५ नोव्हेंबर १९५६), ‘मासिक मौज’ (दिवाळी अंक १९२४), ‘मासिक सत्यकथा’ पहिला अंक (नोव्हेंबर १९३३), साप्ताहिक सोबत पहिला अंक (मे १९६६), माणूस मासिक पहिला अंक (जून १९६१) असे कितीतरी. शिवाय हे दिवाळी अंक विशिष्ट काळानंतर आपल्या अंकातील निवडक साहित्याचे विशेष अंक, संस्मरणीय ग्रंथ प्रकाशित करीत असतात. असे ‘निवडक अबकडइ’ (रौप्यमहोत्सवी २०१२), ‘श्री दीपलक्ष्मी क्लासिक्स’ (निवडक - १९५८-२०००), ‘ऐवज’ (ऋतुरंग दिवाळी - १९९३-२००९) ही माझ्या संग्रही आहेत. खरे तर या सर्वच अंकांबद्दल लिहायला हवे. पण, आज मी फक्त ‘ऐवज’बद्दलच तुम्हास सांगायचे ठरविले आहे. ‘ऋतुरंग’ दिवाळी अंक मराठी दिवाळी अंक परंपरेत सन १९९३ मध्ये दाखल झाला. त्याचे संपादक आहेत अरुण शेवते. मूळ कवी मनाचा हा मित्र मनुष्य वेल्हाळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्यांनी व्यक्तिचित्र, नाटक, लेख लिहिले, तरी त्यांचा मूळ पिंड संपादकाचाच. ‘हाती ज्यांच्या शून्य होते’, ‘नापास मुलांची गोष्ट’, ‘मद्य नव्हे मंतरलेले पाणी’, ‘रंगल्या रात्री’, ‘मला उमगलेली स्त्री’ ही त्यांच्या दिवाळी अंकाची नंतर झालेली पुस्तके. त्यांचा प्रत्येक दिवाळी अंक नंतर ग्रंथ म्हणून प्रकाशित होतो. कारण तो एका विषयावर अनेकांना लिहिते करतो. ही अरुणची किमया! अरुण शेवते यांनी कुणाकुणाला लिहिते केले सांगू? अमृता प्रीतम, सोनिया गांधी, एम. एफ. हुसेन, गुलजार, बेगम परवीन सुलताना, यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर, दीप्ती नवल, किशोरी अमोणकर, सुशीलकुमार शिंदे, बाबासाहेब पुरंदरे, ना. धों. महानोर, डॉ. रघुनाथ माशेलकर, शबाना आझमी आणि कित्येक़ मराठीत लिहिलेले भारतीय सेलेब्रिटी अशी सूची कुणाला तयार करायची, तर ऋतुरंग दिवाळी १९९३ ते २०१७ ची नुसती अनुक्रमणिका डोळ्याखाली घातली तरी सूची तयार!‘ऋतुरंग’चा ‘ऐवज’ ग्रंथ (२०१०) म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला, संगीत, राजकारण, पत्रकारिता, आदी क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवडक आत्मकथनांचा संग्रह होय. अरुण शेवते त्यांना कळायला लागल्यापासून दोनच कामे करतात. मे ते आॅक्टोबर अंक विषय निश्चित करणे, लेखकांना भेटणे, त्यांच्याकडून लिहून घेणे, जाहिराती मिळविणे व अंक वेळेत तयार करणे. नोव्हेंबर ते एप्रिल अंक वितरण, जाहिरात वसुली, अंकास ग्रंथरूप देणे, असा यांचा ऋतु आणि रंग एकच, तो म्हणजे दिवाळी. आहे की नाही गंमत? कोणत्याही गोष्टीचा नावलौकिक लीलया कधीच होत नसतो. त्यामागे असतात माणसाचे कष्ट, चिकाटी, चिंतन!गुलजार अरुण शेवते यांना लेखन तर देतातच; पण न विसरता दिवाळी भेटही देतात. सुशीलकुमार शिंदे त्यांच्या प्रत्येक अंकात लिहितात. मंगेश पाडगावकर-हा अरुण शेवते नावाचा भन्नाट माणूस काही न करता (नोकरी वा अन्य उद्योग!) ‘दिवाळी अंक एके दिवाळी अंक’ जगतो म्हणून.... सांस्कृतिक, सामाजिक कार्य करतो, म्हणून मानधन घेणे नाकारतात. विठाबाई नारायणगावकर अंगात फणफणता ताप असताना फडाफड फडातल्या रात्री जाग्या करते. यमुनाबाई वाईकर तासभर बोलून टेप बंद होता लक्षात आल्यावर आनमान न करता परत ‘वन्समोअर’ बोलत राहतात. हे सर्व अशक्य ते शक्य होते. शेवतेंच्या सायासामुळे, जिद्द, चिकाटीमुळे.एकदा अरुण शेवते ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र गुहा यांचा एक लेख वाचत होते. त्यांना वाचताना लक्षात आले की, महात्मा गांधी एकदा परीक्षेत नापास झाले होते. झाले दिवाळी अंकाचा विषय ठरला. ‘नापास मुलांची गोष्ट’ (२००४). कोणकोण नापास विद्यार्थी मिळाले माहीत आहे? - इंदिरा गांधी, आईनस्टाईन, जे. कृष्णमूर्ती, आर. के. लक्ष्मण, गुलजार, सुशीलकुमार शिंदे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. नरेंद्र जाधव, अमिताभ बच्चन, व्ही. शांताराम, दादा कोंडके, नेल्सन मंडेला, डॉ. अनिल अवचट, डॉ. अच्युत गोडबोले, अभिनेते गणपत पाटील, डॉ. श्रीराम लागू, किशोरी अमोणकर या थोरामोठ्यांची यादी वाचून आता मला ‘मी पण नापास झालो होतो’ हे सांगायला लाज वाटत नाही. ‘ऐवज’मध्ये मैत्र जिवाचे, सहजीवन, मला उमगलेली स्त्री, माझं घर, मी व माझे मद्यपान, एकच मुलगी (ज्यांना एक मुलगी झाली तरी त्यांनी दुसरे अपत्य जन्माला घातले नाही, अशांची आत्मकथने), सिनेमाचे दिवस, रंगल्या रात्री, स्वप्नी जे देखिले, प्रेमस्वरूप आई, मनातला पाऊस, नातेसंबंध, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अविस्मरणीय दिवस, माझं जगणं, माझी भूमिका, यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर दया पवार, मेघना पेठे, प्रा. मे. पु. रेगे, बाबा कदम, रवींद्र पिंगे, कुमार केतकर, दिनकर रायकर, निळू फुले, आर. आर. पाटील (आबा), सुरेखा पुणेकर, देव आनंद, रामदास भटकळ, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, डॉ. सदानंद मोरे, प्रभृती मान्यवरांचे लेख वाचायला मिळतात आणि आपले जगच बदलून जाते. जीवन बदलायचे तर बाह्य जग समजून घ्यायला हवेच.मराठी आत्मकथनात्मक साहित्य भारतीय भाषातील श्रेष्ठ मानले जात असले तरी जगातील भाषांतील गाजलेली आत्मकथनेच खरा साहित्यिक ऐवज. ‘द डायरी आॅफ यंग गर्ल’(अ‍ॅनाफ्रँक), ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ (नेल्सन मंडेला), ‘माय लाईफ’ (इझाडोरा डंकन), ‘जखन छोटो चिलो’ (सत्यजित राय), ‘कन्फेशन’ (लिओ टॉलस्टॉय), ‘द वर्ड’ (ज्या पां सार्त्र), ‘अप फ्रॉम स्लेव्हरी’(बुकर ही वॉशिंग्टन) ही आत्मकथने वाचली नसली तरी मिळवून वाचा.---- डॉ. सुनीलकुमार लवटे(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत)