आटपाडी : आटपाडीतील सिमेंटचा रस्ता दिघंची येथे केल्याप्रकरणी युवा नेते अनिल पाटील यांनी शनिवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकले. पोलिसांनी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधून दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आटपाडीचा अण्णा भाऊ साठे चौक ते धांडोर मळा असा ४०० मीटर दुभाजक सिमेंटचा रस्ता आणि दोन्ही बाजूस गटारी मंजूर असताना डांबरी रस्ता करण्यात येत आहे. शिवाय आटपाडीतील रस्ता दिघंची येथे करण्यात आला आहे. याप्रकरणी आटपाडीवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत अनिल पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आटपाडीत जोपर्यंत असा रस्ता होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराला काम बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला होता. ठेकेदाराने शुक्रवारी काम बंद ठेवले, मात्र शनिवारी पुन्हा काम सुरू केले.
अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला. तिथे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयास टाळे ठोकले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला आणि त्यांची कार्यकर्त्यांशी चर्चा घडवून आणली. उद्या, सोमवारी याबाबत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आटपाडी शहरातील रस्ता गायब केल्याबद्दल शुक्रवारी दिंघची येथील रस्ता काम बंद पाडण्यात आले होते, तर आटपाडीत दोन दिवस आराखड्यानुसार रस्ता करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास टाळे ठोकण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगूनसुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी आंदोलन केले.
रस्ता कामाबद्दल कोणत्याही प्रकारे तोडगा निघत नसल्यामुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.