इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे किरकोळ कारणातून झालेल्या भांडणात लोखंडी पाना आणि लोखंडी गजाने एकमेकांवर हल्ला चढवत खुनाच्या प्रयत्नाची घटना घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
ऋषिराज विकास पाटील (वय २०) याचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. त्याच्या शेजारीच हल्लेखोर आशिष अंकुश जाधव (वय २४) याचे दुकान आहे. जाधव याने पाटील याला दारूच्या नशेत शिवीगाळ करत ‘उद्याच्या उद्या तुझे दुकान हलवायचे, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’, असे म्हणत फिर्यादीच्या फलकाचे आणि दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर लोखंडी पाना ऋषिराजच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले.
यानंतर ऋषिराजने आपले मित्र शैलेश मोरे, प्रसाद पाटील यांना सोबत घेऊन आशिष जाधव याला लोखंडी गजाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. शैलेश मोरे याने लोखंडी पंख्याने डाव्या पायावर मारहाण केली. वरील सर्वांविरुद्ध खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भरते आणि अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.