विटा : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत विटा येथील प्रशांत प्रताप कदम या तरुणाने सोमवारी विटा तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेत केल्याने त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.
विटा येथील प्रशांत कदम यांचे वडील शहरातील श्री हॉस्पिटल या कोविड रुग्णालयात उपचार घेत होते; परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे वडिलांचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करून संबंधित डॉ. राहुल वारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा सोमवारी आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रशांत कदम यांनी दिला होता.
सोमवारी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी तहसील परिसरासह मुख्य रस्त्यावर पोलीस फौजफाटा तैनात केला होता. सकाळी ११ वाजता कदम दुचाकीवरून तेथे आला. पोलिसांची नजर चुकवून त्याने दुचाकी तहसील आवारात घुसली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला प्रवेशद्वाराजवळ अडविले. त्यावेळी पोलीस व कदम यांच्यात झटापट झाली. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी त्यांची समजूत काढून तहसीलदारांशी चर्चा करण्याचा तोडगा काढला. तरीही कदम याने गेल्या महिनाभरापासून चर्चा करतोेय, पण कारवाई होत नसल्याने मी आत्मदहन करणारच, असे सांगितले. त्यामुळे अखेर पोलिसांनी प्रशांत कदम या तरुणास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
चौकट :
आमच्याकडून उपचारात कोणताही हलगर्जीपणा झाला नाही. ऑडिटपूर्वी बिलात जास्त आलेली ३ हजार २४५ रुपयांची रक्कम आम्ही संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांना परत केली आहे. आंदोलक प्रशांत कदम हे सोयीनुसार आरोप करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत श्री हॉस्पिटलचे डॉ. राहुल वारे यांनी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे व्यक्त केले.
फोटो - ०५०७२०२१-विटा-आत्मदहन : विटा तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवारी सकाळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशांत कदम या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले.