लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : महापुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेल्या दुर्धर प्रसंगामध्ये मानवाप्रमाणेच जनावरांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघामार्फत २१ पूरग्रस्त गावांमध्ये मोफत पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन केले, असे प्रतिपादन दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी केले.
देववाडी (ता. शिराळा) येथे फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघ व पशुसंवर्धन विभाग यांच्यातर्फे आयोजित पशुचिकित्सा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष नाईक म्हणाले, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या सूचनेनुसार २१ पूरग्रस्त गावांमध्ये पशुचिकित्सा शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरामध्ये ६ हजार ४०१ जनावरे तपासली. यामध्ये औषध उपचार मोफत करण्यात आले.
यावेळी संघाचे व्यवस्थापक दिनकर नायकवडी, कार्यकारी संचालक रवींद्र यादव, सरपंच संगीता वरेकर, बाबासाहेब वरेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, डॉ. के. जी. माळी, सर्व पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.