आटपाडी: ग्रामपंचायतीच्या वतीने तलावापासून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलशुद्धिकरण प्रकल्पाची स्वच्छता सुरू केल्याने आटपाडीकरांना आता नेहमीपेक्षा एक दिवस उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. आटपाडीत सध्या पाच दिवसातून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळते. स्वच्छतेच्या कामामुळे सहा दिवसातून नागरिकांना पाणी मिळेल, अशी परिस्थिती आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी सतत कुठे ना कुठे रस्ता खोदत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच नवीन रस्त्यांच्या कामामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत. त्यामुळे वारंवार उन्हाळ्यात पिण्याचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. फिल्टर प्लांट स्वच्छता करण्यात येत असल्याने सध्या पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर एक दिवस नेहमीपेक्षा उशिरा आटपाडीकरांना पाणी मिळणार आहे.
मागील दोन वर्षापूर्वी फिल्टर प्लांट कार्यान्वित करून पूर्ण गावाला स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. आटपाडी तलावातून थेट पाणी उपसा करून त्याला जवळच आटपाडी गावासाठी जलशुद्धिकरण प्रकल्प करण्यात आला आहे.
आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी फिल्टर प्लांट स्वच्छ व निर्जंतुक करणे गरजेचे असल्याने फिल्टर प्लांट पाणी शुद्धिकरण प्रकल्प स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले. नेहमीपेक्षा एक दिवस पाणीपुरवठा उशिरा होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले आहे.
यावेळी ॲड. धनंजय पाटील, उपसरपंच अंकुश कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, प्रकाश मरगळे, राजेंद्र बालटे, शिवाजी मेटकरी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम चालू आहे.
फिल्टर प्लांट स्वच्छता मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत कदम, आरोग्य सेवक हरीराम नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.