लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नवीन पिढीतील तरुणांची पर्यावरण व निसर्गाप्रती जागरूकता वाढीस लागली असून ही एक आश्वासक बाब आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. ते सांगली येथे ‘आभाळमाया’च्या ४१व्या अंकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, ‘आभाळमाया’चे मानद संपादक वैजनाथ महाजन, अध्यक्ष प्रमोद चौगुले उपस्थित होते. शिर्के म्हणाले, पर्यावरण विषयास वाहिलेल्या या अंकाची अतिशय सुंदर मांडणी करण्यात आली आहे. ‘आभाळमाया’ची निसर्ग आणि पर्यावरणप्रती कटिबद्धता या अंकाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. पर्यावरण व निसर्ग रक्षणासाठी समाजात सर्व घटकांना उपयुक्त असा सहभाग महत्त्वाचा ठरत आहे.
डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले की, प्रमोद चौगुले व त्यांचे ‘आभाळमाया टीम’ ही निसर्ग संवर्धन क्षेत्रात मोठे कार्य करीत आहे. त्यांची भूमिका निसर्ग व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला पूरक ठरत आहे.
प्रा. वैजनाथ महाजन यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास सुमेध शहा, प्रा. नारायण उंटवाले, प्रा. बी. पी. लाडगावकर, प्रा. एस. एस. शेजाळ, प्रा. जया कुरेकर, प्रा. संजय ठिगळे, राजेंद्र मेढेकर, अजित लिमये, गजानन पटवर्धन, उदय कुलकर्णी, अशोक घोरपडे, प्रा. रमेश चराटे, हरिभाऊ साळुंखे, उदयसिंह पाटील, किरण यादव, श्रीकांत पाटील, मोहित चौगुले उपस्थित होते.
फोटो ओळी : येथील ‘आभाळमाया’च्या अंकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डाॅ. जे. एफ. पाटील, वैजनाथ महाजन, प्रमोद चौगुले उपस्थित होते.