लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक कुमार काका वायदंडे (वय ५५) याला मंगळवारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. शिराळा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिराळा येथील तक्रारदार व त्यांच्या भावांमध्ये वादावादी होऊन ते प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. वायदंडे याने तक्रारदारांच्या भावांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रुपये मागितले होते. चर्चेअंती तक्रारदाराने दोन हजार देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
त्यानुसार पथकाने मंगळवारी येथील पोलीस ठाण्यात सापळा लावला होता. लाचेची रक्कम स्वीकारत असताना वायदंडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. शिराळा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, सलीम मकानदार, अविनाश सागर, सीमा माने, अजित पाटील, राधिका माने, संजय कलगुटगी यांनी केली.