फोटो १४ शीतल ०४
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महावितरण कंपनीने कोरोना काळात सरासरी बिल लागू केल्याने निर्माण झालेली तफावत कमी करून २५ टक्के रक्कम भरून घ्यावी. उर्वरित रक्कम १२ हप्त्यांत भरण्याची मुभा देऊन सामान्य जनता, शेतकरी व कारखानदार यांना दिलासा द्यावा, असे साकडे सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घातले.
प्रदेशाध्यक्ष पटोले रविवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या विजय बंगल्यावर कृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात म्हटले आहे की, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळातील वीज बिल माफ करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण, आता महावितरणकडून वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडली जात आहेत. आम्ही कोरोना काळात वाढीव वीज बिलाबाबत अनेक आंदोलन केली. शासनाकडे वीज बिलातील फरक वजा करून १२ समान हप्त्यांत बिल भरण्याची मुभा देण्याबाबत विनंती केली आहे. त्याचा निर्णय झाल्यास आम्ही आपणास विनंती करतो की, सामान्य जनता, शेतकरी व कारखानदार यांना दिलासा मिळेल. तसेच जिल्ह्यात निर्माण झालेल्या मीटर तुटवड्यामुळे अनेक अर्ज वीज जोडणीसाठी प्रलंबित आहेत. त्यावरदेखील योग्य निर्देश त्वरित देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
यावेळी समितीचे सतीश साखळकर, माजी नगरसेवक हणमंत पवार, पृथ्वीराज पवार, महेश खराडे, महेश पाटील उपस्थित होते.