मिरज : मिरजेत ३५० सार्वजनिक मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका व वाद्यांना प्रतिबंध असल्याने विविध वाहनांतून ‘मोरयाऽऽ’च्या गजरात सार्वजनिक मंडळांच्या व घरगुती गणेशाचे आगमन झाले.
लक्ष्मी मार्केट ते शनिवार पेठ रस्त्यावर गणेशमूर्ती, सजावट साहित्य, फळे, फुले व इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. मार्केट परिसरात गणेशमूर्ती व साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. महापालिकेने रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रीस प्रतिबंध करून मिरज हायस्कूलच्या मैदानावर विक्रेत्यांची व्यवस्था केली होती. मात्र तरीही अनेक विक्रेत्यांनी शनिवार पेठ रस्त्यावर स्टाॅल थाटले होते.
रस्त्यावर मंडप उभारणीस मनाई असल्याने सार्वजनिक मंडळांनी खासगी जागेत गणेशाची प्रतिष्ठापना केली. मिरवणुकांना प्रतिबंध असल्याने काही मंडळांनी गणेश आगमनप्रसंगी दुचाकी रॅली काढली. मिरजेतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या मिरवणूक मार्गावरील स्वागत कमानी सलग तिसऱ्यावर्षी रद्द करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.