सांगली : सांगली बाजार समितीच्या संचालकांची मुदत दि. २६ ऑगस्ट २०२० रोजी संपली आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार एक वर्षाची मुदतवाढ मिळाली असून, ती २६ ऑगस्टरोजी संपली आहे. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी शेतकरी संघटना सहकार आघाडीप्रमुख संजय कोले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली आहे.
ते म्हणाले की, कोरोनाचे कारण देत राज्य सरकारने अधिनियमानुसार बाजार समित्यांना मुदतवाढ दिली. राजकीय स्वार्थ पाहून एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. वर्षानंतरही सहकार निवडणुका घेण्याऐवजी पुन्हा मुदतवाढीच्या हालचाली करीत आहेत. अधिनियमानुसार कोणत्याही नैसर्गिक संकटात वर्षापेक्षा जास्त मुदतवाढ सहकारी संस्थांना देता येत नाही.
बाजार समितीकडील ३४ कोटी रुपयांच्या ठेवी हाेत्या. या ठेवीतून विकास कामे केल्याचे दाखवून त्यांचा चुराडा केला आहे. या सर्व कारभाराची चौकशी पणन संचालकांकडे केली आहे. सध्या मुदतवाढ संपल्यानंतरही मागील तारखा टाकून काही निधी खर्च केला जात आहे. पणन संचालकांनी पाच वर्षांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही कोले यांनी केली आहे.