: बिळाशी (ता. शिराळा) येथे कोकरूड रस्त्यावर बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास बाळासाहेब भाऊसाहेब पाटील यांच्या जनावरांच्या शेडजवळ तीन बिबट्यांचे दर्शन झाले. गेल्या आठ दिवसांत कुसळेवाडी, दुरंदेवाडी, बिळाशी परिसरातील कुत्रे व मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर बुधवारी रात्री एकापाठाेपाठ एक निघालेल्या तीन बिबट्यांनी दर्शन दिल्याने ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
कोकरूड येथील स्वप्निल हवालदार, सचिन शेटे, प्रीतम काेरे, लक्ष्मण दिंडे हे चाैघे बुधवारी रात्री माेटारीतून बिळाशीकडे येत हाेते. बिळाशी येथील बाळासाहेब पाटील यांच्या जनावरांच्या शेडजवळ त्यांना माेटारीच्या उजेडात तीन बिबटे दिसले. प्रकाशझोत समाेर येताच या बिबट्यांनी डोंगराच्या दिशेने पळ काढला. हे बिबटे पूर्ण वाढ झालेले असून, भक्ष्याच्या शोधात ते वस्तीकडे येत हाेते. गेल्या काही दिवसांत बिळाशी परिसरात बिबट्याने कुत्र्यांवर तसेच शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला चढवला आहे. दुरंदेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी बिबट्याने जनावरांच्या गाेठ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सतर्क नागरिकांनी त्याला पळवून लावले हाेते. धोंडेवाडी येथील बाजीराव साधू खोत यांच्या गाेठ्यातही बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला हाेता.