मिरज : मिरजेत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ कायम असून, आज शनिवारी अब्दुल लतीफ शेख (वय ६०) या वृद्धाचा गॅस्ट्रोसदृश आजाराने मृत्यू झाला. शासकीय व खासगी रुग्णालयांत आजही मोठ्या संख्येने उपचारासाठी रुग्ण दाखल झाल्याने रुग्णांची संख्या तीनशेवर पोहोचली आहे.शहरात दूषित पाण्यामुळे कॉलरा व गॅस्ट्रो या साथीच्या आजारांची तीव्रता कायम आहे. खासगी रुग्णालयांतही उपचारासाठी रुग्णांची गर्दी आहे. म्हैसाळ रोड झोपडपट्टीतील अब्दुल लतीफ शेख या वृद्धाचा आज गॅस्ट्रोसदृश आजाराने मृत्यू झाला. हातगाडीवर फळविक्री करणारे शेख दोन दिवस जुलाब व उलट्यांमुळे आजारी होते. घरी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शेख यांचा मुलगा व नातीलाही जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत गॅस्ट्रोमुळे तीन वृद्धांचा मृत्यू झाला आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तिघांचाही मृत्यू गॅस्ट्रोने नव्हे तर वेगवेगळ्या आजाराने झाल्याचा दावा केला. आज शासकीय रुग्णालयात ४२ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. रुग्णालयात जागा नसल्याने अनेक रुग्णांची उपचारासाठी धावपळ सुरू होती. जलवाहिनीची गळती सापडली नसल्याने दूषित पाणीपुरवठा थांबला नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा हतबल झाली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या बाह्मणपुरी, वखारभाग, टाकळी रोड परिसरात एकाच कुटुंबातील अनेकजणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. दूषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी महापालिकेच्या ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न सुरू होते. दूषित पाणीपुरवठा अद्याप थांबला नसल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दगाव वेस परिसरातील जुनी जलवाहिनी बंद करून नवीन जलवाहिनीचे काम सुरू केले आहे. शहरातील म्हैसाळ वेस, उदगाव वेस, नदी वेस, एसटी स्टँड या भागातील ड्रेनेज व मुख्य ड्रेनेज वाहिनी म्हैसाळ वेस, पंचशील चौक येथे तुंबल्याने या भागातील सांडपाणी मोठ्याप्रमाणात साचले होते. परिसरातील तक्रारीमुळे येथील ड्रेनेज वाहिन्या प्रवाहित करण्यात आल्या. कोकणे गल्लीतील खंदकात साचलेल्या पाण्याचा उपसा पंपाद्वारे करण्यात येत आहे. रुग्णांना औषध व क्षार संजीवनीची पाकिटे देण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी दिली. खासदारांकडून विचारपूसगॅस्ट्रोने तीन दिवसांत तिघांचा बळी गेला आहे. मात्र, मृत्यू झालेल्या रुग्णांना उच्च रक्तदाब व हृदयरोग असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. गॅस्ट्रो साथ आटोक्यात येत नसल्याने सांगली सिव्हील, मिरज वैद्यकीय महाविद्यालय व गुलाबराव पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाच्या डॉक्टरांची महापालिकेने मदत मागितली आहे.खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांनी आज शासकीय रुग्णालयात गॅस्ट्रो रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. महापालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्राची पाहणी केली.
गॅस्ट्रोसदृश साथीचा आणखी एक बळी
By admin | Updated: November 23, 2014 00:35 IST