सांगली : सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी आज सत्ताधारी गटाने सहकारतपस्वी बापूसाहेब पुजारी पॅनेलमधील उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये ७0 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यातील १४ उमेदवारांचे अर्ज सोमवारी दाखल केले असून, मंगळवारी ७ मार्च रोजी पॅनेलच्या उर्वरित उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत. सांगली अर्बन बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. सत्ताधारी गटाने सोमवारी पॅनेल जाहीर करून उमेदवारी अर्जही दाखल केले. अर्बन बँकेसाठी एकूण २८ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी ८२ अर्जांची विक्री झाली. आजअखेर १७२ अर्जांची विक्री झाली आहे. बँकेचे एकूण ५९ हजार सभासद आहेत. त्यापैकी तीन हजार सभासद थकबाकी व इतर कारणांमुळे अंतिम मतदारयादीतून वगळण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी आता ५६ हजार मतदार आहेत. उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. बँकेसाठी दहा मे रोजी मतदान व १२ मे रोजी मतमोजणी होणार आहे. ४ एप्रिल ते ८ एप्रिलदरम्यान अर्ज दाखल, ९ एप्रिलला छाननी व २४ एप्रिल रोजी अर्ज माघारीची मुदत आहे. त्यामुळे आता अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत आहे. मंगळवारी ७ मार्च रोजीही अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)सत्ताधारी पॅनेलमध्ये बापूसाहेब पुजारी, प्रमोद पुजारी, महादेवराव देशमुख, आनंद भिडे, अनिल गडकरी, अॅड. हरीष प्रताप, श्रीराम कुलकर्णी, टिळक स्मारकचे विश्वस्त माणिकराव जाधव, पोपटराव डोर्ले, अविनाश पोरे, अॅड. सतीश पाटील, अॅड. रवी अडकिन्नी, अनिल सातपुते, अश्विनी कुलकर्णी, बार्शि येथील श्वेता पाठक यांचा समावेश आहे.
सत्ताधाऱ्यांच्या पॅनेलची घोषणा
By admin | Updated: April 7, 2015 01:19 IST