हणमंत पाटीलसांगली : वाचकांकडून पुस्तके वाचली जात नाहीत, ही तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) खोटी ठरविली आहे. ‘अंनिस’च्या ‘दाभोलकरांचा विचार घरोघरी’ या मोहिमेद्वारे एक वर्षात २ लाख ५० हजार प्रबोधन पुस्तकांच्या खपाचा उच्चांक गाठला आहे. छोटेखानी २५ पुस्तकांच्या संचाला आदिवासी भागापासून ते विदेशातूनही प्रतिसाद मिळाला आहे.‘अंनिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाली. त्यानंतर डॉ. दाभोलकर यांचे विचार व कार्याचा प्रचार करण्यासाठी प्रबोधनाची मोहीम सुरू झाली. त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्ताने ‘अंनिस’चे सांगली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व लेखक राहुल थोरात यांनी डॉ. दाभोलकर यांच्या विचारांच्या छोट्या पुस्तक संचाची संकल्पना मांडली. ही संकल्पना ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, प्रभाकर नानावटी, राजू देशपांडे व अनिल चव्हाण यांनी उचलून धरली.दाभोलकर यांचे विज्ञानवादी व प्रबोधन विचारांची अनेक मोठी पुस्तके आहेत. साधारण २०० ते ३०० पानांची ही पुस्तके आहेत. मात्र, या मोठ्या पुस्तकांऐवजी प्रत्येक विषयावरील नेमका सारांश, तोही सोप्या शब्दांत आणि केवळ २० ते ३० पानांची छोटी पुस्तके अन् तेवढीच २० ते ३० रुपयांची अत्यल्प किंमत ठेवायची, ही संकल्पना सर्वांनाच आवडली.डॉ. दाभोलकर यांच्या १०व्या स्मृतिदिनानिमित्ताने २० ऑगस्ट २०२३ ला पहिल्या १० पुस्तकांच्या संचाची १० हजार प्रतींची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय झाला. त्याची सोशल मीडियांतून व कार्यकर्त्यांच्या ‘दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या मोहिमेद्वारे प्रचार करण्यात आला. त्यामुळे आवृत्ती प्रकाशित करण्यापूर्वीच सर्व पुस्तकांची १० दिवसांत आगाऊ नोंदणी होऊन पुस्तके हाताेहात संपली, अशी माहिती ‘अंनिस’चे राहुल थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आदिवासी क्षेत्र ते विदेशातही मागणी..पहिल्या आवृत्तीतील छोटेखानी १० पुस्तकांच्या संचाला मिळालेला प्रतिसाद पाहून आणखी १५ विषयांच्या पुस्तक संचाचे प्रकाशन करण्याचा निर्णय झाला. या दुसऱ्या आवृत्तीवेळी उर्वरित १५ पुस्तकांच्या संचाच्या १० हजार प्रती प्रकाशित करण्यात आल्या. गेल्या वर्षभरात विविध सामाजिक संस्था, सहकारी बँका, प्रतिष्ठित उद्योजक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खरेदीसाठी पुढाकार घेतला. खरेदी केलेले पुस्तक संच आदिवासी शाळांमध्ये, तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने वाटप करण्यात आले. तसेच, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व दुबई देशांतील मराठी माणसांनी या प्रबोधन संचाची ऑनलाइन मागणी नोंदविली. त्यामुळे एक वर्षात छोट्या २५ पुस्तकांच्या अडीच लाख प्रती विकता आल्याचा अभिमान वाटतो, असे राहुल थोरात यांनी सांगितले.
लोकांना ज्या विषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्या विषयांबद्दल या प्रबोधन संचातील पुस्तिका थेट बोलतात. जसे की, ‘फलज्योतिष शास्त्र का नाही,’ ‘सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा’, ‘आध्यात्मिक बुवाबाजी‘, ‘श्रद्धा-अंधश्रद्धा फरक काय?’, विवेकी समाज धारणेसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ही अंनिसच्या कार्यकर्त्यांची तळमळ आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तिका विकणे शक्य झाले. -मुक्ता दाभोलकर, कार्यकर्त्या, अंनिस