लोकमत न्यूज नेटवर्क,
आष्टा : माजी ग्रामविकास मंत्री व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब डांगे व सचिव अॅड. चिमण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या धन्वंतरी रुग्णालयात सुरू असलेले कोविड सेंटर रुग्णांना वरदान ठरले आहे. येथील रुग्णांच्या संख्येने शतक पार केले असून यातील ५० टक्के रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी गेले आहेत.
अण्णासाहेब डांगे धन्वंतरी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये विविध प्रकारच्या उपचार पद्धतीचा वापर केला जात आहे. त्यामध्ये प्लाझ्मा थेरपीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तसेच कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ज्यांना बेड उपलब्ध नव्हते त्या रुग्णांवरदेखील उपचार झाले आहेत.मध्यप्रदेश उज्जैनमधून एक रुग्ण दाखल होऊन बरा होऊन परतला आहे. सातारा, सांगली ,कोल्हापूर ,पुणे, मुंबई ,सोलापूर आदी जिल्ह्यांमधून हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, सचिव अॅड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे, कार्यकारी संचालक प्रा.आर.ए.कनाई, प्राचार्य डॉ. एस. एन.ओझा आदींचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.
सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात सकाळी आणि सायंकाळी राऊंड झाल्यानंतर पेशंटच्या तब्येतीची पूर्ण कल्पना दिली जाते तसेच रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था धन्वंतरी हॉस्पिटलमार्फत मोफत करण्यात आली आहे. डॉ. सतीश परांजपे, डॉ.तुषार शेलार, डॉ.सुशांत कणसे, डॉ.सुशांत जगदाळे आणि वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन स्टाफ, ऑक्सिजन इन्चार्ज, फार्मसी इन्चार्ज एक्स-रे व सी.टी.स्कॅन इन्चार्ज यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. कोविड सेंटर समन्वयक डॉ. जयवंत खरात व सहकारी संयोजन करीत आहेत.