मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील सरपंचपदी काकासाहेब धामणे-सुरेश खोलकुंबे-सदानंद कबाडगे गटाच्या अनिता रवींद्र क्षीरसागर व उपसरपंचपदी प्रदीप सावंत-आप्पासाहेब हुळ्ळे गटाचे तुषार खांडेकर यांची निवड झाली.
सरपंच निवडीत क्षीरसागर यांनी विरोधी गटाच्या कीर्ती परदेशी यांचा ९ विरुद्ध ८ मतांनी, तर उपसरपंच निवडीत खांडेकर यांनी ॲड. पुष्पा शिंदे यांचा ९ विरुद्ध ८ मतांनी पराभव केला. प्रतिष्ठा पणाला लागलेल्या निवडीत दोन्ही गटांनी परस्परांना राजकीय धक्के देत सत्तेत वाटा मिळविला. मालगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी धामणे, खोलकुंबे, कबाडगे व शेतकरी संघटना या गटांचे ८, माजी सरपंच प्रदीप सावंत गटाचे ८ व हुळ्ळे गटाचा १ असे सदस्य निवडून आले आहेत. सरपंच निवडीत कोणता गट बाजी मारणार याची उत्सुकता होती. खांडेकर यांच्या पाठिंब्यावर सावंत गट सत्तेत येईल असे चित्र होते. मात्र धामणे गट फूट पाडण्यात यशस्वी ठरला. सावंत गटाच्या क्षीरसागर यांनी धामणे, खोलकुंबे, कबाडगे गटांना समर्थन दिल्याने या गटाला दोन्ही पदे मिळणार असे चित्र होते. प्रत्यक्ष निवडीत दोन्ही गटांनी एकमेकांना राजकीय धक्के देत सत्तेत वाटा मिळविला. बहुमत असताना उपसरपंच निवडीत एक मत फुटल्याने धामणे, खोलकुंबे व कबाडगे गटांत निरुत्साह, तर बहुमत नसताना उपसरपंचपद मिळाल्याने सावंत- हुळ्ळे गट उत्साहित होता.
निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी सदाशिव मगदूम यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांनी सहकार्य केले.
चौकट
सरपंच कोणाचा : परस्परविरोधी दावे
सरपंचपदी निवड झालेल्या अनिता क्षीरसागर माजी सरपंच प्रदीप सावंत गटातून निवडून येऊन पंचायत समिती सदस्य काकासाहेब धामणे गटात दाखल झाल्या. त्यांची सरपंचपदी निवड होताच सावंत व हुळ्ळे गटाने त्या आपल्याच गटाच्या असल्याचा दावा केला आहे. क्षीरसागर व त्यांचे पती रवींद्र यांनी मात्र धामणे, खोलकुंबे, कबाडगे व स्वाभिमानी शेतकरी संघटना गटाच्या सरपंच असल्याचे सांगितले.