विटा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेला विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जनावरांचा आठवडी बाजार सोमवार, दि. ३० ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती आनंदा माने यांनी दिली.
सभापती आनंदा माने म्हणाले, विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रत्येक सोमवारी शेळ्या-मेंढ्या, कोंबडी, बैल, म्हैस आदी जनावरांचा आठवडी बाजार भरत होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकारी यांनी दि. ३० एप्रिल २०२१ पासून विटा येथील जनावरांचा आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून विटा येथील जनावरांचा आठवडी बाजार बंद होता. सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाचे कोरोना नियम पाळून तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवत विटा येथील जनावरांचा आठवडी बाजार येत्या सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यात येत आहे.
तरी शेतकरी, व्यापारी, दलाल तसेच जनावरे खरेदी करणारे खरेदीदार व विक्रेते यांनी कोरोनाविषयक शासनाचे सर्व नियम पाळून तसेच सोशल डिस्टन्स ठेवून बाजारात व्यवहार करावेत. व्यवहार करताना एका ठिकाणी केवळ पाच व्यक्तींना एकत्र थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरी सर्व नियमांचे पालन करून आठवडी बाजारमधील व्यवहार सुरळीत ठेवावेत, असे आवाहन सभापती आनंदा माने यांनी केले.
फोटो : विटा कृषी उत्पन्न बाजार समिती स्वागत कमान.