सांगली : लॉकडाऊन काळात रेशनवर मोफत मिळणारी डाळ आता विकतदेखील मिळेनाशी झाली आहे. खुल्या बाजारात डाळींच्या किमती शंभरीपार गेलेल्या असताना रेशनवरील डाळीने सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. डाळींमुळे ताटात आमटी दिसू लागली होती. लॉकडाऊन शिथिल होताच डाळीचे वाटपही थांबले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजनेतून जुलै ते नोव्हेंबरदरम्यान अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिकेस १ किलो मोफत चणाडाळ वाटण्यात आली. काही ठिकाणी तूरडाळ तर काही ठिकाणी हरभऱ्याचे वाटप झाले. जुलै ते सप्टेंबरअखेर ४४९.३० टन चणाडाळीचे वाटप जिल्हाभरातील लाभार्थ्यांना करण्यात आले. दिवाळीसाठी प्रतिकुटुंब एक किलो साखरेसोबत डाळही मिळाली.
सध्या मात्र शासनाने डाळीबाबत हात आखडता घेतला आहे. ऑक्टोबरपासून डाळीचा पुरवठा थांबला आहे. खुल्या बाजारात हरभरा डाळ, तूरडाळी शंभरीपार गेली आहे. अशावेळी रेशनवर ५५ रुपये किलोप्रमाणे मिळणार्या डाळीचा मोठा दिलासा होता. लॉकडाऊन काळात तिचा शंभर टक्के उठाव झाला. सध्या डाळ नसल्याने ताटामध्ये आमटीची कसर भाजीपाल्याने भरुन काढावी लागत आहे.
चौकट
सध्या जिल्ह्यात कोठेच डाळीचे वाटप सुरू नाही. लॉकडाऊन काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजनेत तांदूळ, गहू व डाळीचे मोफत वाटप झाले. दिवाळीच्या सुमारास ५५ रुपये प्रतिकिलो दरानेही डाळ रेशनवर उपलब्ध होती. ग्राहकांनी तिला चांगला प्रतिसाद दिला.
चौकट
रेशनवर सध्या गहू, तांदूळ व साखर उपलब्ध आहे. अन्नसुरक्षा योजनेतून प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ मिळतो. प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिला जातो. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना वीस रुपये किलोनुसार प्रतिशिधापत्रिका एक किलो साखरदेखील दिली जात आहे.
पॉईंटर्स
- एकूण शिधापत्रिका १६१४७९९
- प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका ३७३४०९
- अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका ३१८४१
- एपीएल केशरी शिधापत्रिका २३३३४८
कोट
प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात डाळ मिळाली होती. ऑक्टोबरपासून शासनाकडून डाळ आलेली नाही. ती पुन्हा मिळण्यासंदर्भात कोणतीही सूचना नाही.
- वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी
-----------
----