लोकमत न्युज नेटवर्क
वांगी :
वांगी ( ता. कडेगाव ) येथे मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. आपत्तकालीन परिस्थितीत रुग्णवाहिका मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. याचा विचार करून वांगी ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. ग्रामस्थांसाठी मोफत सेवा देण्यात येणार आहे.
वांगी येथे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यासाठी दि. ३० रोजी प्रांताधिकारी गणेश मरकड व तहसीदार शैलेजा पाटील याच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, मात्र रुग्णांची चिंचणी कोविड केअर सेंटर, चिंचणी ग्रामीण रुग्णालय, विलगीकरण कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, कडेगाव व आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाची मोठी अडचण येत असल्याचा मुद्दा समोर आला.
त्यामुळे वांगी ग्रामपंचायतीने रुग्णवाहिकेची सेवा करण्याचा निर्णय घेतला व ऑक्सिजन व अन्य साधनांची सोय करून तातडीने ती रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. ही सेवा वांगी ग्रामस्थांसाठी मोफत करण्यात आली आहे.